कला परंपरा- संस्कृतीचा मिलाफ

>> डॉ. मनोहर देसाई

सावंतवाडीच्या या राजघराण्यातून कलापरंपरेला कायमच प्रोत्साहन दिले गेले व कला जिवंत ठेवण्यासाठी व्यासपीठ उभे केले. सावंतवाडीतील लाकडी खेळणी कला सर्वदूर पोहोचवण्यात त्यांचा वाटा मोठा आहे.   

इंग्रज राजवटीच्या उतरत्या काळात व देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या उत्कर्षाच्या काळात नकळत सावंतवाडीतील ही कला दुर्लक्षित होऊ लागली. एकेकाळी राजाश्रयामध्ये वाढलेली ही कला, परंतु पुढे याच  कलाकारांना नवनवीन अडचणींना सामोरे जाण्याची वेळ आली. 1960च्या सुमारास सावंतवाडीचे राजे शिवरामराजे सावंत भोसले व त्यांच्या पत्नी सत्त्वशीलाराजे सावंत भोसले यांच्या निदर्शनास ही बाब आली. महाराज आणि त्यांच्या पत्नी या दोघांनाही चित्रकलेमध्ये प्रचंड रुची होती. किंबहुना ते वेळ मिळेल तेव्हा कलानिर्मिती करून कलेचा आनंदसुद्धा घेत असत. पुढे राणीसाहेब सत्त्वशीलाराजे यांनी या कलाकारांची पुन्हा एकदा मोट बांधली.  या कलाकारांची गंजिफा तयार करण्याची कला अतिशय सुबक होती व त्याच माध्यमातून त्यांनी या कलाकारांना जगभरातून या कलाकृती तयार करून व्यवसाय करण्याची संधी प्राप्त करून दिली. राजवाडय़ातील संग्रहालयांमध्ये काही कलाकारांना प्रत्यक्ष कामावर रुजू करून त्यांना त्यांच्या उपजीविकेसाठी साधन उपलब्ध करून दिले. आजही सावंतवाडीच्या या राजघराण्यातून राजवाडय़ामध्ये स्वत राजेसाहेब खेम सावंत भोसले (सहावे), महाराणी शुभदादेवी सावंत भोसले तसेच युवराज लखमराजे व त्यांच्या पत्नी युवराज्ञी श्रद्धाराजे यांनी ही कला जिवंत ठेवण्यासाठी व्यासपीठ उभे केले आहे.

 अनेक कलाकार आजही येथे कलानिर्मिती करत आहेत. कोकणातील चाकरमानी मुंबई, पुण्यात स्थिरावले आणि सणांच्या निमित्ताने किंवा दिवाळी, मे महिन्याच्या सुट्टीत गावी आलेल्या कुटुंबांनी पुन्हा एकदा या बाजारपेठेला चांगले दिवस आणले.

सावंतवाडीतील ही खेळणी आता देशातील व परदेशातील अनेक दुकानांमधून उपलब्ध होत आहेत. त्याचप्रमाणे नव्या ऑनलाइन पद्धतीच्या बाजारपेठेतसुद्धा ती ऑर्डर करून मिळू शकतात. सावंतवाडीच्या चितारी गल्लीतील अनेक खेळण्यांची दुकाने किंवा गांधी चौकात काणेकर कुटुंबीयांनी या व्यवसायात उत्तम प्रकारे काम केले आहे. आजही कोकणातील सहलीमध्ये लाकडी खेळण्यांच्या दुकानांमध्ये अनेक पर्यटकांची गर्दी असते.

लाकडी खेळणी तयार करण्यासाठी कोकणात मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱया पंगाऱयाच्या झाडांचा उपयोग हे कलाकार करतात. यामध्ये ही झाडे कापून त्याची लाकडे उन्हात रचून ठेवतात. ही लाकडे कोरडी झाल्यानंतर ती पुन्हा पाण्याच्या हौदामध्ये बुडवून ठेवतात. यामध्ये ही लाकडे आतून कुजवून ती बाहेर काढून पुन्हा वाळवतात. ही पूर्ण वाळलेली लाकडे आता वजनाने खूपच हलकी होतात. त्यानंतर त्यातून अनेक आकार घडवणे या कलाकारांना सोपे जाते. अतिशय हलक्या वजनाची सावंतवाडीतील लाकडी फळे व खेळणी त्यामुळेच खूप प्रसिद्ध आहेत. लाकडात घडवलेल्या आकारांवर पुढे चिंचोक्याची खळ लावतात. ती पुन्हा घासून गुळगुळीत करून त्यावर रंगलेपन करतात आणि नंतर त्याच्यावर चकाकी आणण्यासाठी वॉर्निशचा एक हात मारतात.

लाकडाची खेळणी करण्यासाठी सुरुवातीला कारागीरांना खूप मेहनत पडत असे. जसजसा काळ पुढे सरकला व नवीन पिढी या व्यवसायामध्ये आली तसे या पिढीने नव्या तंत्रज्ञानाचा वापर ही कला पुढे नेण्यासाठी केला. लेथ मशीन, कटिंगसाठी वेगवेगळ्या कटरचा वापर तसेच सध्याच्या नवतंत्रज्ञानातील सीएनसी मशीन, राऊटर,  लेझर कटिंग मशीन   यांचा वापर आता सुरू झाला आहे. रंगकामासाठीसुद्धा मशीनचा वापर सुरू झाला आहे. आज जगभर ऑनलाइन पद्धतीनेसुद्धा यातील अनेक चितारी कुटुंबे  ही खेळणी पोहोचवत आहेत.

परंपरा आणि संस्कृती जपणारी अनेक कुटुंबे आजही विविध धार्मिक व कौटुंबिक कार्यक्रमांसाठी येथे येऊन या वस्तू खरेदी करतात. शालेय विद्यार्थ्यांच्या पुस्तकात प्रसिद्ध असणाऱया सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांची माहिती घेण्यासाठीसुद्धा अनेक गाडय़ा तलावाच्या बाजूला थांबतात. घरातील सजावटीमध्ये आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तयार करून बनवलेली अनेक शिल्पे ठेवण्याकडे जरी लोकांचा कल असला तरीसुद्धा आपल्या संस्कृतीतील ही लाकडी खेळणी तेवढय़ाच आवडीने घेऊन सजावटीसाठी वापरणारे नव्या पिढीतील अनेक लोक दिसतात.  नव्या पिढीतील लहान मुले यातील एखादे खेळणे खेळताना घरातील वरिष्ठ व्यक्ती त्यांच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत अगदी आवडीने सांगते की, “हे खेळणे मीसुद्धा खेळलो आणि तुझे बाबासुद्धा याच खेळण्याबरोबर खेळले आहेत आणि आता तू तिसऱया पिढीतला.’’ अनेक वर्षे टिकणाऱया या खेळण्यांच्या सोबत येथे नकळत एक मायेचा ओलावा जपलेला दिसतो.

चकाकणाऱया झगमगाटाच्या दुनियेत आजही आपण आपली संस्कृती जपावी व या लाकडी वस्तू, खेळणी घेऊन ही कला व कलाकार जिवंत ठेवण्यासाठी हातभार लावावा हीच अपेक्षा.

[email protected]