मोनेगिरी- केशवा माधवा

>> संजय मोने

‘केशवा माधवा’ ही जोडगोळी. आता यातलं नेमकं केशव कोण किंवा माधव कोण हा प्रश्न आजही तसाच आहे. प्रश्न बाजूला ठेवला तर त्यांचे जुने उट्टे काढण्याचे उद्योग मात्र समोरच्याला जेरीस आणणारे आहेत. त्यामुळे नावात काय आहे, हे म्हणत दोघांचे उपद्व्याप ऊर्फ कर्तृत्व जाणून घ्यायला हवं.

त्या दोघांची जोडी होती पार शाळेपासून. एकाच वयाचे होते ते, पण एका वर्गात नव्हते, म्हणजे वेगवेगळय़ा तुकडीत होते. त्या काळात शाळेतल्या मुलांना शिस्त लागावी म्हणून ‘आरएसपी’ नावाचा एक खेळ सगळीकडे सुरू होता. आता बहुतेक तो अस्तित्वात नसावा. एक वेगळा गणवेश घालून गणेश विसर्जनाच्या दिवशी जमणाऱया गर्दीला ताब्यात ठेवण्यासाठी ही लहान-लहान बालकं उन्हातान्हात मुख्य रस्त्याच्या कोपऱयाकोपऱयावर उभी केली जायची. तहान, भूक, ऊन याची पर्वा न करता ती लोकांना आवरायचं काम करायचा आटोकाट प्रयत्न करायची. (अर्थात त्यांना बिलकुल भीक न घालता जनता अस्ताव्यस्त फिरत असायची. महात्मा गांधींनी कायदेभंग चळवळ चालवली होती, पण ती स्वातंत्र्य मिळेपर्यंतच होती हे बऱयाच जणांना माहीत नव्हतं, आजही नाहीये. त्यामुळे लोक कायदेभंग करत बापूजींचं अर्ध राहिलेलं कार्य पूर्ण करतात.)

तर अशा एका दिवशी अमोघ आणि प्रवीण एकमेकांना भेटले. त्यांचं वाहतूक नियंत्रण करायचं काम होतं. ते दोघेही नववीतले विद्यार्थी (म्हणजे चौदा-पंधरा वर्षांचे), तर झालं असं की, एक नवनिर्वाचित सत्ताधारी माणसाचा मुलगा त्यांना आडवा आला. त्याचा घरचा गणपती विसर्जनासाठी जात होता. तो सर्व वाहतूक नियम ओलांडून जात होता. आमच्या या केशवा किंवा माधवामधल्या एकाने त्या मिरवणुकीला अटकाव केला. मग सगळे एकमेकांबरोबर भिडले. केशवा किंवा माधवापैकी एकाने (कोणी ते आजतागायत माहीत नाही) त्या उर्मट आणि बेलगाम सत्ताधारीच्या पोराच्या थोबाडीत भडकावली. तो मुलगा या दोघांपेक्षा वयाने मोठा होता. त्याचे आसपास बगलबच्चेही होते. ते पुढे सरसावून येईपर्यंत दोघांनी आपापल्या गणवेशातले कंबरपट्टे उपसून काढले. गरागरा फिरवत ते त्या माजलेल्या पोराला बडवून काढायला लागले. बघता बघता बाकीचे नागरिक आता आपल्याला अजिबात धोका नाही हे लक्षात येताच त्या पोरावर आणि आजूबाजूला असलेल्या इतर बगलबच्च्यांवर तुटून पडले. सगळीकडे पांगापांग झाली. एकाने विचारलं,

“तुम्ही आहात तरी कोण?’’

बाजूलाच विसर्जनाच्या निमित्ताने गाणी लागली होती.

‘केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा.’

ते ऐकून अमोघ म्हणाला किंवा प्रवीणही असेल कदाचित. थोडक्यात दोघांपैकी कोणीतरी म्हणाला, “आम्ही केशवा माधवा आहोत. जर कोणी आमची नावं सांगितलीत तर कापून टाकू,’’ असं म्हणून दोघेही तिथून गायब झाले, पण त्यांनी सांगितलेली त्यांची नावं आजतागायत कायम आहेत. पुढे गंमत म्हणजे, ज्या पोराला त्यांनी तुडवला होता. तो पुढे काही वर्षांनी निवडणुकीला उभा राहिला आणि निवडून आला. त्याच्या प्रचाराची धुरा याच दोघांनी सांभाळली होती.

“काहीच वाटत नाही तुम्हाला त्याचा प्रचार करताना? अरे किती पैसे छापलेत त्याच्या बापाने? एक वडापावची गाडी होती आणि आता 30 लाखांची गाडी आहे त्याच्याकडे.’’ एक असंतुष्ट आत्मा, ज्याला आपण निष्कलंक आहोत याचा उगाचच अभिमान होता तो म्हणाला.

“काय गंमत आहे. सगळय़ा लोकांना राजकीय लोकांकडे येणारे बेहिशोबी पैसे दिसतात आणि ते आपल्याला कमावता येण्याची हिंमत नाही म्हणून शिव्या देतात. तुम्ही कमवा! कोण नाही म्हणतंय?’’ दोघांपैकी एकाने उत्तर दिलं. एव्हाना लोकांना वाटत आलं होतं की, हे दोघे मिळून एक टोळी स्थापन करणार. कारण अशा टोळीचे नेते सत्तेत पार वरपर्यंत पोहोचले होते. गंमत इथे संपत नाही. त्यानंतर दोघेही, आता आपण त्यांना ‘केशवा माधवा’ असंच म्हणू या. दोघेही एकाच महाविद्यालयात दाखल झाले. चार वर्षं एकत्रच शिकले. कायद्याचा अभ्यास केला त्यांनी. तिथे शिकत असताना दोन सख्ख्या बहिणी होत्या त्यांच्या प्रेमात दोघेही पडले. यथावकाश त्यांचं लग्नही झालं. आंतरजातीय होती दोन्हीही लग्न. पण हल्ली चाललाय तसला गलिच्छ सामाजिक हस्तक्षेप तेव्हा होत नव्हता. त्यामुळे संसारही सुखाचा सुरू होता.

अनेक वर्षांपूर्वी त्या दोघांनी ज्या नेत्याच्या मुलाला तुडवला होता, तो आता त्यांच्या कथेत परत आला होता. त्याची एक केस कोर्टात आली होती. आता केशवा वकील होता आणि माधवा न्यायाधीश होता. केसमध्ये केशवा त्या नेत्याच्या मुलाचा वकील होता आणि माधवा न्यायाधीश. त्या आता नेत्या झालेल्या मुलावर पाच-सहा आरोपपत्रं दाखल झाली होती. आता इतक्या वर्षांनी त्या नेत्याला राजकीयदृष्टय़ा तुडवायची संधी चालून आली होती आणि शाळेत असताना दिलेला मार थोडा कमीच होता असं केशवा आणि माधवाचं एकमत होतं.

“केशवा, तू पुरावे आणून त्याला निरपराध ठरवायचं काम कर. मी तुला त्याच्या विरोधात काय काय करता येईल याची इत्यंभूत माहिती देतो. तू केस कशी अधिकाधिक लांबवता येईल एवढं बघ. बाकी निर्णय काय लावायचा ते मी बघतो. माझ्या बायकोला तू सहकारी वकील म्हणून नेमून घे. ती आजही माहेरचं नाव लावते. त्यामुळे कोणाला कसलाही संशय येणार नाही.’’ असं सगळं ठरवून दोघांनीही आपापले पेले रिकामे केले आणि घरी निघून गेले.

कायद्याचा कीस काढून केस लांबत गेली. माधवाचा लौकिक अत्यंत निःस्पृह न्यायाधीश म्हणून सर्वांना माहीत होता. दरम्यान दुसऱया निवडणुका जाहीर झाल्या. नेत्याचा मुलगा जो आता एक स्वत मोठा सत्ताधारी पक्षाचा नेता झाला होता, तो अर्थातच निवडणुकीला उभा राहिला. माधवाचा मुलगा सोशल मीडियाशी निगडित होता, त्याने त्या नेत्याच्या विरोधात चालू असलेल्या केसवर सगळीकडे बोंबाबोंब केली. जबरदस्त गदारोळ झाला. जिथे-जिथे प्रचाराला तो नेता जायचा तिथöतिथे त्याच्या ‘कर्तृत्वाच्या’ गोष्टींचे फलक लागलेले असायचे. सर्वसामान्य जनता त्या-त्या ठिकाणी जाऊन त्याला अडचणीत आणणारे प्रश्न विचारायचे. अर्थात ही सगळी माधवाच्या मुलाने जमवून आणलेली माणसे असायची. त्यात काही स्त्रियाही असायच्या. तो नेता जेरीला आला. बऱयाच ठिकाणी त्याला पळ काढायला लागला. त्याची माणसे आपली ताकद दाखवून जनतेला धाक दाखवायचा प्रयत्न करायची, पण प्रत्येक ठिकाणी कॅमेरा घेतलेली माणसे हजर असायची. त्यामुळे त्यांचा नाईलाज व्हायचा. एका ठिकाणी तर त्या नेत्याकडे तिथल्या स्थानिक (?) जनतेने निवडून आल्यावर जर खटल्याचा निकाल तुमच्या विरोधात लागला तर राजीनामा देईन असे प्रतिज्ञापत्र देण्याची मागणी केली. केस चालूच राहिली मात्र निवडणुकांचे निकाल लागले आणि तो नेता सपाटून पराभूत झाला.

“का तुम्ही दोघांनी असं केलंत?’’ केशवा किंवा माधवाच्या बायकोपैकी एकीने विचारलं.

“काय आहे, त्याला जेव्हा आम्ही बडवला होता तेव्हा त्यानेही आम्हाला काही फटके मारले होते. ते आमच्यावर उधार होते. त्याची वसुली करायची होती.’’ कोणीतरी एक शांतपणे म्हणाला आणि आपापले पेले रिकामे करून सगळे जेवायला बसले.

बाकी सोडा, पण सध्याच्या काळातल्या निवडणुका बघता उमेदवाराकडून प्रतिज्ञापत्र लिहून घ्यायची वेळ आली आहे असे तुम्हाला नाही का वाटत?

[email protected]