खाऊगल्ली- मोमोज, नूडल्स आणि पुरणपोळी

>> संजीव साबडे

इटिंग आऊटचा विचार आल्यास कांदिवली पश्चिमेला असलेल्या महावीर नगरच्या गल्लीत चक्कर मारायलाच हवी. मोमोज, नूडल्सचे असंख्य प्रकार, मिकी माऊस डोसा, कोरिअन फूड ट्रेल, पावभाजीतील व्हरायटी आणि पुरणपोळीतील वैविध्याची चव अनुभवायची असेल तर एकदा इथे जायलाच हवं.

कधी कांदिवलीला किंवा पश्चिम उपनगरात जाणं झालं किंवा तिथेच तुम्ही राहत असाल तर एक ठिकाण माहीत असायलाच हवं. ते ठिकाण म्हणजे कांदिवलीच्या पश्चिमेला असलेली महावीर नगरमधली खाऊगल्ली. त्या नगराच्या नावात महावीर हा उल्लेख असल्याने ती शाकाहारी असणार हे उघडच आहे. अर्थात माहीम, महंमद अली रोड, कुर्ला, वांद्रे, जोगेश्वरी अशा काही खाऊगल्ल्या वगळता बाकीच्या शाकाहारीच आहेत. शिवाय गंमत अशी की मुलुंड, घाटकोपर, बोरिवली, चर्नीरोड, विलेपार्ले अशा ज्या ठिकाणी बहुसंख्य गुजरातीभाषी भाग आहेत वा जिथे या मंडळींचं सतत जाणं असतं, तिथेच प्रामुख्याने खाऊगल्ल्या व त्याही शाकाहारी आहेत.

महावीर नगरची खाऊगल्लीही शाकाहारी खाद्यपदार्थांचा स्वर्ग म्हणून ओळखली जाते. संध्याकाळी साडेचार वाजता सुरू होणारी ही खाऊगल्ली रात्री साडेअकरा वाजेपर्यंत सुरू असते. त्यामुळे संध्याकाळी त्या भागात असलात वा मनात इटिंग आऊटचा विचार आल्यास महावीर नगरच्या गल्लीत चक्कर मारावी. सोबत लहान मुलांना नेलं तर ती तिथला मिकी माऊस डोसा पाहून आणि खाऊन नक्की खूश होतील. तिथली पोडी इडली, इडली सांबार, मद्रासी टिपिकल
कॉफी ही खासियत विसरून चालणार नाही. अवंतिक चेन्नई कॅफेचा हा मालक पूर्वी एका थ्री स्टार रेस्टॉरंटमध्ये काम करायचा. तिथे डोशाचा आकार बिघडला आणि त्यातून या मिकी माऊस डोशाचा जन्म झाला. मोमोज आणि नूडल्स हे दोन्ही पदार्थ सर्वांनाच आवडतात. महावीर नगरच्या गल्लीत तर मोमोजचे अनेक स्टॉल्स आहेत. त्यातील मोमोज अॅण्ड पंकी या स्टॉलला हमखास भेट द्या. तिथे साध्या मोमोजबरोबर पेरी पेरी क्रीम मोमोज, शेझवान मोमो, ग्रेव्ही मोमो, मोमो चाटही मिळतात. आपल्या आवडीप्रमाणे गरमागरम कमी अधिक तिखट मोमोज खाण्याचा आनंद खासच. जवळच पांडा मोमोजमध्ये मोमोजच्या वेगवेगळय़ा चवी अनुभवता येतात.

सर्वच खाऊगल्ल्यांमध्ये सँडविचचे अनेक स्टॉल्स असतात आणि रेस्टॉरंटपेक्षा वेगवेगळे प्रकार ते बनवत असतात. महावीर नगरची खाऊगल्लीही त्यास अपवाद नाही. पण त्यापेक्षा तिथला वैशिष्टय़पूर्ण प्रकार म्हणजे पनीर चॉप. चॉप हा खरं तर मांसाहारी प्रकार. चॉप सुय हा अमेरिकन चायनीज प्रकार खूपच प्रसिद्ध. त्यात मांस, अंडी व भाज्या असतात. पण दिल्ली स्टाईलचे शाकाहारी चॉपही खूप लोकप्रिय. इथे शेगडीवर पनीर व भाज्येंपासून अप्रतिम चॉप्स बनवले जातात. तिथे जाणारी जवळपास प्रत्येक नवी व्यक्ती हा प्रकार खाऊन पाहतेच. येथील सर्व प्रकारांप्रमाणे या पनीर चॉपची किंमतही वाजवी आहे. महावीर नगरच्या या खाऊगल्लीत द कोरिअन हाऊस नावाचा फूड ट्रक (प्रत्यक्षात टेम्पो) येतो. त्यात काही कोरिअन खाद्यपदार्थ बनतात. पण अनेकांना कोरिअन चव माहीत नसल्याने तिथे लोक कोरिअन नूडल्सच प्रामुख्याने खातात. तिथे एक खाद्यप्रकार खाण्याचं आव्हान दिलं जातं. जोलो चिप चॅलेंज! हा प्रकार अतिशय म्हणजे खूपच तिखट असतो. तो खाणं अवघड. जे कोणी जोलो चिप खाईल, त्याला प्यायला थंडगार ड्रिंक दिलं जातं. तिथे कोरिअन नूडल्स खायला हरकत नाही, पण जोलो चिप चॅलेंज स्वीकारणं खूपच त्रासदायक आहे.

आपल्यापैकी काहींनीच हॉट डॉग या विचित्र व नावडत्या नावाचा पदार्थ खाल्ला असेल. काहींना तर त्यात कुत्र्याचं मांस असतं, असंच वाटतं. पण या अमेरिकन प्रकारात असलं भलतंसलतं अजिबात नसतं. या खाऊगल्लीत शाकाहारी कॉर्न
डॉग मिळतो. कॉर्न व चीजचा हा ‘कॉर्न डॉग’ चवीला अतिशय छान आहे. त्यावर वेगवेगळे सॉस घालून लोक ते खात असतात. तिथेही नूडल्स मिळतात. हा कोरिअन फूड स्टॉल आहे आणि नाव आहे के टाऊन. आपण बहुतेकांनी दाबेली हा गुजराती प्रकार कधी ना कधी नक्की खाल्ला असेल. पण कच्छी दाबेली मिसळ हा अभिनव प्रकार केवळ महावीर नगरच्या खाऊगल्लीतच मिळतो. हा प्रकार म्हणजे काय हे सांगितलं तर खाण्यातली गंमत संपेल.

कोणत्याही खाऊगल्ली शिरलात की, तिथे काही पावभाजीचे स्टॉल्स हमखास असतात. महावीर नगरमध्ये महावीर पावभाजी स्टेशन आण्ड फास्ट फूड आणि जग्गू अण्णा प्युअर व्हेज हे ठिकाण आहे. या अण्णाकडे पावभाजीबरोबर चीज गार्लिक ब्रेड, वाफल, मेदुवडा, भेळ, शेव बटाटा पुरी असे सारे प्रकार आणि वेगवेगळे ज्यूस मिळतात. हे तिथल्या लोकांचं आवडतं
रेस्टॉरंटच आहे. महावीर पावभाजी मात्र नावाप्रमाणे त्याच प्रकारासाठी लोकप्रिय आहे. अनेक प्रकारची पावभाजी तिथे मिळते. महावीर नगरच्या खाऊगल्ली परिसरात असलेल्या गुप्ता नावाच्या तीन भेळपुरीवाल्यांकडे संध्याकाळी गर्दी असते. तेथील भेळपुरी, पाणीपुरी तर बेस्टच आहे. एकीकडे 40 रुपयांत अनलिमिटेड पाणीपुरी मिळते. पण एखादी व्यक्ती 10/12 पेक्षा जास्त पाणीपुरी खाऊ शकत नाही. त्यामुळे त्याच्या दृष्टीने अनलिमिटेड देणं नक्की हिशेबात बसतं.

नावात भेळपुरी असलं तरी तिथे रगडा पॅटीस, शेव बटाटा पुरी ते चीज सँडविच ब्लास्ट, पिझ्झा, मसाला टोस्ट सँडविच, मेयोनिज चीज सँडविच, पनीर चिली टोस्ट, गार्लिक ब्रेड, चॉकलेट सँडविच हे सारे प्रकार मिळतात.

महावीर नगरच्या खाऊगल्लीचं वैशिष्टय़ काय असं विचाराल तर त्याचं उत्तर आहे पुरणपोळी. होय तिथे प्रसिद्ध पुरणपोळी घर आहे आणि त्यात गाजर पुरणपोळी, खोबऱयाची पुरणपोळी, अननस पुरणपोळी, बदाम पुरणपोळी, चॉकलेट पुरणपोळी, ड्रायफ्रुट पुरणपोळी, अंजीर पुरणपोळी असे अद्भुत व अभिनव प्रकार तुम्हाला खायला मिळतील. सर्व खाऊगल्ल्यांत विविध खाद्यप्रकारांबरोबर फ्रेश फ्रुट ज्यूस, लस्सी, फालुदा, कुल्फी, आईक्रीम, गुलाबजाम असे थंड व गोड पदार्थ मिळतातच, पण महावीर नगरची खाऊगल्ली ही एकमेव असेल की, जिथे मराठमोळी व अभिनव अशी पुरणपोळी मिळते. आपण क्वचितच बाहेर पुरणपोळी खातो. फार तर बाहेरून आणून घरी खातो. पण खाऊगल्लीत फेरफटका मारल्यावर पुरणपोळी खायला मिळण्यासारखा आनंद नाही. तो आनंद अवश्य अनुभवावा.

[email protected]