स्पॅम कॉलला बसणार आळा; चक्षु पोर्टल अपडेट होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंटरनेटमुळे लोकांची कामे सुरळीत होतात, पण सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे हीच बाब लक्षात घेऊन सरकारने सायबर क्राईम आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी एक नवीन पोर्टल सुरू केलेय. या पोर्टलचे नाव ‘चक्षु’ असे ठेवण्यात आलेय. या पोर्टलवर नागरिक सायबर गुन्हेगारीच्या तक्रारी करू शकतात. येत्या काळात चक्षु पोर्टल अपडेट करण्यात येणार आहे.

मोबाईलवर स्पॅम कॉल किंवा स्पॅम एसएमएस येण्याचे प्रमाण वाढले आहे. याला आळा घालण्यासाठी टेलिकॉम विभाग प्रयत्नशील आहे. याचाच भाग म्हणजे टेलिकॉम कंपन्यांना एआय डिजिटल मंचाशी जोडले जाणार आहे. सध्या एआयचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) जमाना आहे. दूरसंचार विभाग एआय तंत्रावर आधारित डिजिटल कॉन्सेट ऍक्विझिशन (डीसीए) मंच उभारणार आहे. हा मंच टेलिकॉम कंपन्यांना जोडला जाईल. डीसीए मंच म्हणजे कोणत्याही कमर्शिअल कॉल किंवा एसएमएसला ग्राहकांची संमती मिळवून देणे, तो कॉल सुरू ठेवणे किंवा रद्द करणे यासाठीचा एकीकृत मंच आहे. त्यामुळे आपल्याला कोणाचे कॉल येऊ शकतील किंवा नाही, यावर ग्राहकांचे नियंत्रण असेल. अद्याप ग्राहकांनी डीसीए मंचाचा फायदा झालेला नाही. डीसीए मंचाबाबत टेलिकॉम कंपन्यांचे काम धिम्या गतीने सुरू असल्याचे दिसत आहे. याबद्दल ट्रायने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

l एआय डिजिटल मंचप्रकरणी समन्वयासाठी नवीन समिती तयार केली जाणार आहे. यामध्ये दूरसंचार विभाग, ग्राहक मंत्रालय, आणि ट्रायचा सहभाग असेल. इंटरनेटवरून केले जाणारे कॉल आणि व्हॉट्सऍपसाठी मार्गदर्शक तत्त्वे आणण्यावर ही समिती काम करेल.