किस्से आणि बरंच काही- तारक मेहताच्या चष्म्यातून…

>> धनंजय साठे

28 जुलै 2008 हा तसा सामान्य दिवस होता. पण हा दिवस एका टीव्ही वाहिनीच्या माध्यमातून निखळ मनोरंजनाची मेजवानी घेऊन आला. 28 जुलैला ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ही सर्वांची लाडकी मालिका जणु अमरपट्टा घेऊन जन्माला आली. आज तब्बल सोळा वर्षं या मालिकेचा  प्रेक्षक मनमुराद आनंद लुटत आहेत. पोट धरून हसायला  लावणाऱया या मालिकेचा मी एकेकाळी क्रिएटिव हेड होतो याचा मला सार्थ अभिमान आहे.

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेची गंमत अशी की, निर्माते असित मोदी हे अक्षरश दारोदारी फिरावं तसे झाडून एकेका वाहिनीकडे या मालिकेची संकल्पना मांडण्याचा प्रयत्न करत होते. पण कोणत्याही वाहिनीला ही संकल्पना पटत नव्हती. जवळपास सात वर्षं असित मोदींचा संघर्ष अविरतपणे चालू होता. ‘चित्रलेखा’ नावाच्या एक गुजराती साप्ताहिकेत तारक मेहता नामक एक लेखक ‘दुनियाने उंडा चष्मा’ नावाचे सदर गोष्टीरूपात लिहायचे. या सगळ्या गोष्टींना टीव्हीसाठी एका संकल्पनेत बांधून ती संकल्पना असित मोदी त्यांच्या दृढ विश्वासाच्या बळावर अनेक वाहिन्यांचे दरवाजे ठोठावत होते. परंतु यश हाती लागत नव्हतं. पण म्हणतात ना, ‘उपर वाले के घर मे देर है, अंधेर नही…’ असंच काहीसं झालं आणि एक दिवस नवीन सुरू झालेल्या एका टीव्ही वाहिनीने असित मोदींना त्यांची संकल्पना ऐकण्यासाठी बोलावून घेतलं. ती वाहिनी होती सोनी टीव्हीची धाकटी बहीण सब-टीव्ही! त्या वेळी सब-टीव्ही निव्वळ हलक्याफुलक्या विनोदी संकल्पना ऐकत होते.

…आणि ‘देनेवाला जब भी देता, छप्पर फाड के देता’ या म्हणीप्रमाणे झालं. असित मोदींच्या नशिबाची दारं उघडली आणि सुरू झालं एक ऐतिहासिक पर्व, ‘तारक मेहता का उलटा चष्मा…’ चला, मोदींनी इथवर मजल तर मारली. पण आता खरं आव्हान होतं कोणते कलाकार कोणत्या पात्राला योग्य न्याय देऊ शकतील याचं. असित मोदी स्वत गुजराती रंगभूमीशी जोडलेले असल्यामुळे त्यांनी ओळखीच्या कलाकारांपासून सुरुवात करायचं ठरवलं. दिलीप जोशी यांची गुजराती नाटकांमधली कामे पाहता मोदींने जेठालालचे वडील बाबूजीची भूमिका दिलीप जोशीने करावी असं ठरवलं. त्याप्रमाणे बोलणंही झालं. पण त्याच सुमारास मोदींचा मित्र अमित भट बोलता बोलता असित मोदींना म्हणाला की, दिलीप तरुण आहे तर त्याचा जेठालालच्या भूमिकेसाठी का विचार करत नाही? …आणि जेठालाल ठरला. दुसरीकडे बाबूजीच्या भूमिकेसाठी दिलीपने अमित भटचे नाव सुचवलं. तरुण असूनही बाबूजीच्या भूमिकेत लीलया वावरणारा अमित इतकी वर्षं ही भूमिका जगतोय. जेठालाल आणि बाबूजी तर ठरले. आता प्रश्न बाकी कलाकारांचा होता. दिशा वकानीने जेठालालची पत्नी दया अजरामर केली. दिशा हीसुद्धा गुजराती रंगभूमीवरची कलाकार. अफलातून अभिनेत्री आणि अचूक कॉमेडी व टायमिंगचा अभ्यास. त्यामुळे तिच्या कलागुणांना न्याय मिळेल अशी दयाची भूमिका तिला मिळाली. तारक मेहताच्या मुख्य भूमिकेत हिंदी भाषेवर कमालीचं प्रभुत्व असलेला लेखक आणि कवी शैलेश लोढाची निवड झाली. त्यांच्या बायकोच्या भूमिकेत ऑडिशनमधून उत्तीर्ण झालेली गुजराती रंगभूमी, हिंदी मालिकांमधली अभिनेत्री नेहा मेहताची निवड झाली आणि बबिताच्या भूमिकेसाठी मूळ बंगाली अभिनेत्री मुनमुन दत्ताची निवड झाली. गंमत म्हणजे आपल्या सावळ्या रंगरूपामुळे दाक्षिणात्य वाटणारा बबिताचा नवरा अय्यर, याच्या भूमिकेसाठी मराठमोळा तनुज महाशब्देची निवड झाली. गोकुळधाम सोसायटीच्या सेक्रेटरीच्या भूमिकेत अनेक वर्षं दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या मालिकांमध्ये काम करणारा मंदार चांदवडकर आणि त्याची बायको माधवी भिडेची भूमिका सोनालिका जोशीने निभावली. मूळ पारसी असणारी जेनिफर मिस्त्राr ही रोशन सिंग सोढीची बायको रोशनच्या भूमिकेत सहज मिसळून गेली. अचानक गायब होण्याने चर्चेत असलेला गुरचरण सिंग हा एकेकाळी रोशन सिंग सोढीच्या भूमिकेला न्याय द्यायचा. सौ. हाथीच्या भूमिकेत अंबिका रंजनकर मस्त वाटली तर डॉ. हाथीच्या भूमिकेत आझाद! (काही वर्षांपूर्वी याने जगाचा निरोप घेतला…) पोपटलालच्या भूमिकेत चार्टर्ड अकाऊंटंट असलेले श्याम पाठकने धम्माल उडवली. अब्दुलभाईच्या भूमिकेत अभिनेता शरद सांकला, बाघाच्या भूमिकेत तन्मय वेखारिया ठरले.  नट्टू काकांची भूमिका कोण विसरू शकेल? ज्याच्यामुळे मी या मालिकेचा क्रिएटिव हेड बनलो तो दयाशंकर पांडे… म्हणजेच इन्स्पेक्टर चालू पांडे! गोकुळधाम सोसायटीचा सदस्य नसलेला दयाचा भाऊ सुंदर ही भूमिका खणखणीतपणे वठवणारा अभिनेता, मयुर वकानी हा दिशा वकानीचा प्रत्यक्षात मोठा भाऊ आहे. मालिकेत तो दयाच्या धाकटय़ा भावाची भूमिका करतो.

 गोकुळधाम सोसायटीचे शूटिंग फिल्मसिटी गोरेगाव येथे चित्रित व्हायचं आणि सगळय़ांच्या घराच्या आतले शूटिंग कांदिवली इथल्या एक शाळेत अख्खा मजला भाडय़ाने घेतलेल्या वास्तूत चित्रित व्हायचे. त्यामुळे जेठालाल बाल्कनीमध्ये उभा राहून सकाळच्या सूर्याला नमस्कार करतोय हे दृश्य गोरेगावच्या फिल्म सिटीमध्ये चित्रित व्हायचं आणि तो घरात गेल्यानंतरचं दृश्य हे कांदिवलीत व्हायचं. सगळा मूड तोच ठेवून दोन ठिकाणी शूटिंग करणं कलाकारच नाही तर अख्ख्या युनिटच्या दृष्टीने किती अवघड असायचं ते लक्षात आलं असेलच.

जाता जाता एक मजेदार किस्सा सांगावासा वाटतो. बबिता सोसायटीतल्या सर्व बायकांना पोहायला शिकवणार असते आणि जेठालाल बबिताकडून पोहायला शिकण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे असं आमच्या क्रिएटिव बैठकीत ठरलं. बरं, हा विचार कोणीच केला नाही की जे कलाकार या एपिसोडमध्ये सहभागी असणार आहेत त्यांना पोहता येतं का?…आणि याच मुद्दय़ावरून सगळं फिस्कटलं. बबिताला पाण्याची भीती होती. तिला अजिबात पोहता येत नसल्यामुळे जे काही भाग तिच्यावर बेतले होते तेच पाण्यात बुडाले आणि मज्जा म्हणजे दिलीप जोशींना उत्तम पोहता येतं. नंतर ते एपिसोड बबिताचे तळपाय जेमतेम भिजतील इतक्या पाण्यात तिला उभी करून चित्रित केले. त्या सर्व एपिसोडनी धम्माल उडवली आणि प्रेक्षकांना ते भरपूर आवडले. अशा प्रकारच्या अनेक गंमतीजमती सेटवर घडतच असतात…

[email protected]

(लेखक fिक्रएटिव्ह हेड, अभिनेते आणि गायक आहेत.)