Lok Sabha Election 2024 – लोकसभा निवडणुकीत अमेरिकेचा हस्तक्षेप; रशियाच्या दाव्याने खळबळ

देशात लोकसभा निवडणूक सुरू असून आतापर्यंत तीन टप्प्यातील मतदान प्रक्रियाही पार पडली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. लोकशाहीच्या या उत्सवामध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच रशियाने एक खळबळजनक दावा केला आहे. हिंदुस्थानच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अमेरिका हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान हिंदुस्थानमध्ये अस्थिरता निर्माण व्हावी हा अमेरिकेचा प्रयत्न असल्याचा दावा रशियाने केला आहे.

रशियाची सरकारी वृत्तवाहिनी आरटी न्यूजने याबाबत वृत्त दिले आहे. वृत्तानुसार, रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया जाखारोवा यांनी म्हटले की, हिंदुस्थानच्या राजकीय परिस्थितीमध्ये अमेरिका ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यांना हिंदुस्थानातील राजकीय समज आणि इतिहासाची माहिती नाही. जाखारोवा यांनी हिंदुस्थानातील धार्मिक स्वातंत्र्याबाबतच्या अमेरिकेच्या अहवालावर बोलताना हे विधान केले.

अमेरिका सातत्याने हिंदुस्थानच्या धार्मिक स्वातंत्र्याबद्दल खोटे आणि बिनबुडाचे आरोप करत आहे. हिंदुस्थानातील अंतर्गत राजकीय परिस्थिती बिघडवणे आणि लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप करणे हे अमेरिकेचे उद्दिष्ट असल्याचा दावा रशियाने केला आहे.

अमेरिकेकडून सुरु असलेले प्रकार म्हणजे हिंदुस्थानच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करणे आहे. हा प्रकार म्हणजे हिंदुस्थानचा अवमान करणे असल्याचे जाखारोवा यांनी म्हटले.