साऊथ एशियन लिव्हर ट्रान्सप्लांट प्रोग्रामने मुंबईत घडवला इतिहास; यकृत प्रत्यारोपणोत्तर अर्ली रिकव्हरी प्रोग्रामची सुरुवात

साऊथ एशियन लिव्हर इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने मुंबई सेंट्रल येथील वोकहार्ट हॉस्पिटल्सला आपल्या प्रयत्नात उल्लेखनीय यश मिळाले असून मुंबईतील पहिल्या वहिल्या अर्ली रिकव्हरी प्रोग्रामची घोषणा करताना आनंद होत असल्याचे वोकहार्ट हॉस्पिटल्सने म्हटले आहे. यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया म्हटले की, सर्वसामान्य व्यक्तीवर त्याच्या अवाढव्य खर्चाचा ताण आल्याशिवाय राहत नाही. परंतु, यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेबाबतचा अर्ली रिकव्हरी प्रोग्राम जगभरातील रुग्णांसाठी आशेचा किरण ठरणार असून वैद्यकीय नवकल्पनेतही हा उपक्रम मैलाचा दगड ठरणार आहे. शिवाय, ही शस्त्रक्रिया पती – पत्नीचा एकमेकांना असलेल्या आधार, पाठिंब्याचा प्रभाव दाखवून देते. तसेच प्रेमासाठी केलेली कृती जीव वाचवण्यासाठी सर्व प्रकारच्या सीमा ओलांडते हेही यातून दिसून येते.

वोकहार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रल येथील प्रत्यारोपण उपक्रमाचे संचालक डॉ. टॉम चेरियन यांना वैयक्तिकरीत्या तब्बल 700 यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्याचा अनुभव असून त्यातील 400 शस्त्रक्रिया त्यांनी लंडन येथे केल्या आहेत. हिंदुस्थानात प्रत्यारोपण उपक्रमाशी जोडले जाण्याआधी त्यांनी लंडन येथील किंग्ज कॉलेज हॉस्पिटल आणि बरमिंगहम येथील क्विन एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये 15 वर्षांपेक्षा अधिक काळ काम केले आहे.

उपक्रमाची तपशीलवार माहिती देताना डॉ. टॉम चेरियन म्हणाले की, “यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाला सातव्या दिवशी घरी पाठवणे आणि यकृत दात्याला सहाव्या दिवशी घरी पाठवणे सोपी गोष्ट नाही. अशा प्रकारे यश प्राप्त करण्यासाठी काळजीपूर्वक आणि सूक्ष्मातील सूक्ष्म बाबींचे नियोजन आवश्यक आहे. अशा प्रकारची नवकल्पना वैद्यकीय सेवेतील उच्च गुणवत्तेचे निदर्शक असून शस्त्रक्रियेशी संबंधित सर्व बाबी उत्कृष्टपणे हाताळणे, काळजी घेणे आणि तयारी शिवाय अशा प्रकारे रुग्णांना ताबडतोब घरी पाठवणे शक्य नाही.”

वोकहार्ट हॉस्पिटलचा यकृत प्रत्यारोपणविषयक उपक्रम सुरुवातीच्या टप्प्यात असूनही रुग्णसेवेचे वचन प्रारंभीच दिसून आले आहे. वोकहार्ट हॉस्पिटल्स आणि त्यांचे वैद्यकीय पथक पूर्वोत्तर हिंदुस्थानासारख्या भागात रुग्णसेवेसाठी पोहोचण्याच्या प्रयत्नांचा विस्तार करण्यासाठी उत्सुक आहे.