पाकसंस्कृती- मोबाइलदादा

 

>> तुषार प्रीती देशमुख

कशी गं करता तुम्ही ही भाजी?’’ असं विचारताच त्या भाजीची रेसिपीदेखील आनंदाने सांगणाऱया भाजीवालीताईचा मी मोबाइलवाला दादा’. भाजी आणायला जाणं हे निमित्त. भाजीवाल्या ताईंशी गप्पा मारत, थट्टा करत त्यांच्या चेहऱयावर हास्य निर्माण करण्याचा माझा प्रयत्न असतो.

आपण खरंच किती भाग्यवान आहोत नाही का? ऋतूप्रमाणे पिकणाऱया तसंच शरीरात ऊर्जा निर्माण करणाऱया भाज्या आपल्या आहारात आपल्याला खायला मिळत असतात. खरंच आपण भाग्यवान आहोत. कारण ज्या देशात आपण राहतो तो आपला हिंदुस्थान कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे आपला देश नेहमीच समृद्ध असतो. आपली मातृभूमी आई आपल्याला कधीच उपाशी राहू देत नाही. प्रत्येक संकटाला सामोरं जात आपले शेतकरी बंधू-भगिनी मेहनत करून, पिठलं-भाकरी, मिरचीचा ठेचा व ठेचलेला कांदा खाऊन हसतमुखाने भाज्या, फळं आणि धान्याची आपल्यासाठी शेती करत असतात. आज जरी त्यांना शेतीसाठी अनेक सुविधा उपलब्ध असल्या तरी पूर्वापार काही नसतानाही त्यांनी आपल्यासाठी शेती करणं कधीच सोडलं नाही. ज्या ठिकाणी शेतकरी बंधू-भगिनी राहतात त्या-त्या ठिकाणी आपल्या शेतीत पिकणाऱया भाज्या, धान्य आपल्यासाठी विकायला आणत असतात.

“20 रुपयांना वाटा’’ असं त्या म्हटल्या की, मग लगेच आपण म्हणतो, “पन्नासला तीन दे गं!’ परवडत नसताना व्यवसायासाठी त्या ते करतातही. प्रेमाने साद घालणाऱया आपल्या या शेतकरी बंधू-भगिनींकडे आपण जेव्हा भाजी विकत घ्यायला जातो तेव्हा मागचापुढचा कोणताही विचार न करता त्यातही भाव करायला जातो आणि मग त्यांच्याशी थोडासा वादही घालतो.   या सगळ्या विक्रेत्या शेतकरी बंधू-भगिनींचा प्रवास आपल्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे. मी स्वत दादरला राहत असल्यामुळे दादर पश्चिम येथील गोल मंदिराजवळ अनेक भाजीवाले बंधू-भगिनी ताज्या भाज्या, फळं, फुलं विकायला घेऊन येतात. थोडं त्यांच्याबद्दल…

त्यांच्याकडे जाऊन त्या-त्या ऋतूत मिळणाऱया विशिष्ट भाज्या घेतल्यावर आणि एखादी भाजी आपल्याला माहीत नसेल तर त्या भाजीबद्दलची माहिती विचारून, मग “कशी गं करता तुम्ही ही भाजी?’’ असं विचारताच त्या भाजीची रेसिपीदेखील अगदी आनंदाने सांगत असतात. त्या सर्वजणी मला ‘मोबाइलवाला दादा’ अशी हाक मारतात. भाजी आणायला जाणं हे निमित्त असतं, पण त्यांच्याशी गप्पा मारून, थोडी थट्टा करून, मी बनवलेले डान्सचे व्हिडीओ त्यांना दाखवून, त्यांच्या दगदगीच्या आयुष्यात त्यांच्या चेहऱयावर हास्य निर्माण करून त्यांना आनंदी बघण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न असतो.

या सर्व भाजीवाल्या ताई वसई, विरार, डहाणू, पालघर, सफाळा अशा विविध ठिकाणांहून रोज सकाळी घरातली सर्व कामं आटपून, घरच्यांसाठी स्वयंपाक व स्वतसाठी दुपारचा जेवणाचा डबा घेऊन विक्रीसाठी ताजी भाजी गोळा करतात. ती साफ करून, स्वच्छ धुऊन, टोपल्या किंवा झोळ्यांमध्ये व्यवस्थितपणे भरून डोक्यावर वा दोन्ही हातांत धरून ट्रेन चुकू नये यासाठी धावपळ करतात. त्यांच्या नेहमीच्या वेळेची ट्रेन पकडून भाजी विक्रीसाठी दादरला येतात. त्यांच्याकडे मिळणाऱया वेगवेगळ्या ऋतूंमधल्या भाज्यांमध्ये अनेक भाज्या आपण बहुधा पाहिल्याही नसतात किंवा त्यांची नावंदेखील आपल्याला माहीत नसतात, पण ती पौष्टिक भाजी आपल्याला देताना त्याची माहिती त्या सांगतात. म्हणूनच मला अनेकदा माझ्या टीव्ही शोमध्ये या पौष्टिक भाज्यांबद्दलची माहिती व कृती तुमच्यापर्यंत पोहोचवता येते. बाराही महिने न थकता, ऊन असो वा पाऊस, थंडी असो वा ऊन… या सर्वजणी आपल्याला ताज्या भाज्यांचं सकस अन्न खायला मिळावं यासाठी भाज्या, धान्यं, फळं विक्रीसाठी आणत असतात.

सध्याच्या या तीव्र उष्णतेच्या लाटेमध्ये आपल्याला थंडावा मिळावा यासाठी त्या सर्वजणी कोवळे पाणीदार असे ताडगोळे प्रेमाने आणून देतात. त्या व्यवसाय करून फक्त पैसे कमवत नाहीत तर आपल्याला ताज्या, स्वच्छ, कोणतेही केमिकल किंवा रंग न वापरलेल्या भाज्या देतात, पण त्याचबरोबर या व्यवसायातून आपल्याला ते निरोगी ठेवण्याचा आनंद देण्याचाही प्रयत्न करतात. सध्याचा काळ हा मॉलमध्ये जाऊन शॉपिंग करण्याचा किंवा ऑनलाइन ऑर्डर करून वस्तू मागवण्याचा आहे. त्यात भाजीपालासुध्दा आलाच. माझा या संस्कृतीला मुळीच विरोध नाही. अनेकदा वेळ पडली तर मीदेखील ऑनलाइन किंवा मॉलमध्ये जाऊन खरेदी करतोच, पण जो आनंद, आपलेपणा मला या भाजीवाल्या ताईंकडे जाऊन भाजी विकत घेताना मिळतो, तो या सगळ्यामध्ये कायमच मिसिंग असतो. तुम्ही ज्या विभागात राहता त्या विभागातदेखील असे भाजीवाले नक्कीच असतील (शोधले तर सापडतील) तुम्हालाही जेव्हा जेव्हा वेळ मिळेल किंवा थोडासा वेळ काढून अशा भाजीवाल्यांकडे जाऊन भाजी विकत घ्या आणि स्थानिक भाजी विक्री व्यवसायाला प्रोत्साहन द्या. जमलं तर त्यांचं कौतुक करण्यासाठी त्यांच्याबरोबर सेल्फी काढून तुमच्या सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल जरूर लिहा. तुमच्या पोस्टमुळे अनेकांना त्यांची माहिती मिळेल व त्यांनादेखील त्यांच्याकडून ताजी भाजी, फळं, फुलं विकत घेता येतील. याचा त्यांना फायदा पैसे कमावण्यासाठी होईल व तुम्हाला ऋतूप्रमाणे ताज्या पौष्टिक भाज्या खाण्यासाठी होईल. शेतकरी राजा, हे सर्व भाजीवाले जोपर्यंत आपल्यासाठी हा व्यवसाय करीत आहेत तोपर्यंतच आपल्याला ताजे, सकस खायला मिळू शकते, नाही का?

रोजच्या आपल्या आहारातून आपल्याला ऊर्जा प्राप्त करून देणाऱया शीतल, कल्पना, संगीता, सुरेखा, शिल्पा, विजया, रंजना, शोभाताई या सर्व असंख्य भाजीवाल्यांना, त्यांच्या व्यवसायाला, त्यांच्या मेहनतीला सलाम! आपण सर्वांनी त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी भावामध्ये कोणत्याही प्रकारची घासाघीस न करता भाज्या विकत घेऊन त्यांचीदेखील ऊर्जा वाढवायला हवी.