षटकारबाजी नवा इतिहास रचणार; यंदाच्या मोसमात आयपीएलचे षटकारांचे सारे विक्रम मोडले जाणार

एकाच डावात आणि एका सामन्यात सर्वाधिक षटकारांचा विश्वविक्रम कोलकाता-पंजाब सामन्याने मोडला तेव्हा यंदाच्या आयपीएलमध्ये षटकारबाजीचा नवा इतिहास रचला जाणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. 48 व्या सामन्यापर्यंत आयपीएलमध्ये 871 षटकार खेचले गेले असून उर्वरित 26 सामन्यांत आणखी 400 पेक्षा अधिक षटकार सहज लागतील. त्यामुळे एका मोसमात सर्वाधिक षटकारांचा विक्रम यंदा मोडला जाणार, हे कुणाही सांगू शकतो.

यंदा आयपीएलमध्ये प्रत्येक सामन्याला किमान 18 ते 20 षटकार मारले जात आहेत. हीच सरासरी शेवटपर्यंत कायम राहिली तर आयपीएल 1300 षटकारांचा आकडा सहज गाठेल. आयपीएलच्या इतिहासात गेल्या दोन वर्षांत एक हजारपेक्षा अधिक षटकार मारले गेले आहेत. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आयपीएलच्या संघाचा आकडा दहा झाल्यामुळे सामन्यांची संख्या 60 वरून 74 वर पोहोचली. गेल्या मोसमात 1124 षटकार मारले गेले होते तर 2022 मध्ये हा आकडा 1062 इतका होता. आयपीएलमध्ये एका सामन्यात असो किंवा एका मोसमात किंवा कारकीर्दीत, ख्रिस गेलचे नाव अव्वल स्थानावर आहे. त्याचे हे विक्रम मात्र या मोसमातही कुणी मोडू शकेल असे वाटत नाही. गेलने 2013 साली एका मोसमात 59 षटकार खेचले होते. जो आजही अबाधित आहे. यंदा हेन्री क्लासनने सर्वाधिक 28 षटकार खेचले आहे. तसेच अभिषेक शर्मा, शिवम दुबे, सुनील नारायण, ऋषभ पंत, जेक फ्रेझर-मॅकगर्क, विराट कोहली, निकोलस पूरन आणि रियान पराग यांनी 20 पेक्षा अधिक षटकार ठोकले आहेत.

हैदराबादचे षटकारांचे शतक

यंदाचे आयपीएल षटकारबाजीमुळे गाजवले ते हैदराबादने. 2022 च्या आयपीएलमध्ये त्यांनीच 97 षटकार खेचले होते. मात्र यंदा त्यांनी आठ सामन्यांतच षटकारांचे शतक गाठण्याचा पराक्रम केला आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच एका संघाने षटकारांचे शतक साजरे केले आहे. हैदराबादच्या षटकारांचा आकडा नक्कीच दीडशतकही गाठेल, पण त्याचबरोबर अन्य संघही आपल्या षटकारांचे शतक पूर्ण करणार आहे.