ऑनलाइन ऑर्डर केलेले पार्सल उघडताच झाला स्फोट; वडील आणि मुलीचा मृत्यू

गुजरातमधील साबरकांठा येथील वडाली येथे ऑनलाइन ऑर्डर केलेल्या पार्सलचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनलाइन पार्सलची डिलिव्हरी मिळाल्यानंतर पार्सल उघडताना त्याचा स्फोट झाला. या स्फोटात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तेथे प्राथमिक उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक मुलगी आणि तिच्या वडिलांचा समावेश आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास करत आहेत.

सदर घटना वडाळी येथील वेडा गावात घडली. जितेंद्र हिराभाई वंजारा आणि त्यांची मुलगी भूमिका वंजारा अशी मृतांची नावे आहेत. एका अज्ञात व्यक्तीने हे पार्सल वंजारा यांच्या घरी पाठवले होते. त्या पार्सलमध्ये काही इलेक्ट्रॉनिक वस्तू होत्या. इलेक्ट्रॉनिक उपकरणे प्लग इन करताच मोठा स्फोट झाला. या स्फोटात जितेंद्र वंजारांसह त्यांच्या तीन मुली जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.

दरम्यान, जखमींना तातडीने जवळच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये वडील आणि मुलीचा समावेश आहे. तसेच अन्य दोन जखमी मुलींवर उपचार सुरू आहेत. सहाय्यक वैद्यकीय अधिकारी विपुल जानी यांनी सांगितले की, जखमी मुलींपैकी एका मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. पोलीस या घटनेबाबात पुढील तपास सुरू केला आहे.