हिंदुस्थान सुपर एटमध्येच बाद होणार; वॉनने तोडले अकलेचे तारे

हिंदुस्थानी संघाला आणि खेळाडूंना नेहमीच पाण्यात पाहणाऱया माजी इंग्लिश कर्णधार मायकल वॉनने आपल्या अकलेचे तारे तोडले असून हिंदुस्थानचा संघ सुपर-8 मध्येच बाद होणार असल्याचे सांगताना आगामी टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत स्वतःचा देश इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका हे चार संघ उपांत्य फेरी गाठतील असे भाकीत वर्तवले आहे. येत्या 1 जूनपासून टी-20 वर्ल्ड कपला अमेरिका आणि वेस्ट इंडीजच्या बेटांवर सुरुवात होत आहे.

2022 साली इंग्लंडने टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. त्याआधी 2019 साली झालेल्या आयसीसी वन डे वर्ल्ड कपमध्येही तेच विजेते ठरले होते. मात्र याच जगज्जेत्या इंग्लंडला गेल्या वर्षी हिंदुस्थानात झालेल्या वन डे वर्ल्ड कपमध्ये साखळीतच बाद होण्याची नामुष्की ओढावली होती. त्याच्या मते जोफ्रा आर्चर संघात परतल्यामुळे इंग्लंड संघाची ताकद खूप वाढली असून तो सहजगत्या उपांत्य फेरीचा टप्पा गाठेल. तसेच ऑस्ट्रेलियन संघही ताकदीचा असल्याचे मानत त्यांनाही अंतिम चार संघांत स्थान दिले आहे. त्याचप्रमाणे यजमान वेस्ट इंडीजची ताकद टी-20 संघातच असल्यामुळे मायदेशात त्यांचे टी-20 स्टार धमाका करतील आणि आपल्या संघाला उपांत्य फेरीपर्यंत हमखास पोहोचवतील, असाही अंदाज वॉन यांनी वर्तवला आहे. उपांत्य फेरीतला चौथा संघ दक्षिण आफ्रिकेचा असेल. मात्र याच वॉनला हिंदुस्थानचा संघ अत्यंत सामान्य वाटला आहे. म्हणून त्याने आपल्या भाकितात हिंदुस्थानला स्थान दिलेले नाही. त्याचा हा अंदाज किती खरा ठरतो, ते जून महिन्यातच समोर येईल.

यंदा झोपेचे खोबरे होणार नाही; वर्ल्ड कप अमेरिका-विंडीजमध्ये, पण वेळ हिंदुस्थानची