रायगड जिल्हाप्रमुखांच्या गाडीवर मिंधे आमदार गोगावलेच्या गुंडांचा हल्ला; माणगाव जवळ तुफान दगडफेक

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांच्या गाडीवर आज मिंधेचे आमदार भरत गोगावले यांच्या गुंडांनी प्रचंड हल्ला चढवला. 50 ते 60 जणांच्या टोळीने तुफान दगडफेक केल्याने नवगणे यांच्या गाडीचा चक्काचूर झाला असून चालक जखमी झाला आहे. या हल्ल्यात अनिल नवगणे सुदैवाने बचावले आहेत.

शिवसेनेचे रायगड लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी आज महाडच्या छत्रपती शिवाजी चौकात सभेचे आयोजन करण्यात आले होते. उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या सभेत मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना नवगणे यांनी मिंधेंचे आमदार गोगावले यांच्यावर कडाडून टीका केली. ही टीका सहन झाल्याने नवगणे यांच्या गाडीवर गोगावले यांच्या गुंडांनी हल्ला चढवला.

सभा आटोपून नवगणे माणगाव कडे निघाले असता लोणेरे – वीर गावच्या दरम्यान भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यासह 50 ते 60 गुंडांच्या टोळक्याने नवगणे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. काहीतरी काळेबेरे आहे हे लक्षात येताच नवगणे यांनी चालकाला गाडी वेगाने चालवण्यास सांगितले. त्यानंतर गोगवलेंच्या गुंडांनी गाडीवर दगडांचा तुफान मारा केला. या हल्ल्यात गाडीच्या काचांचा चक्काचूर झाला. ड्रायव्हरला दगड लागल्याने तोही जखमी झाला. परंतु नवगणे यांनी हा हल्ला चुकवल्याने ते थोडक्यात बचावले. या घटनेनंतर रात्री उशिरा नवगणे यांनी माणगाव पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली यावेळी शेकडो संतप्त शिवसैनिकांचा जबाब पोलीस ठाण्याजवळ जमला होता. रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते.