कॉकटेल!

>> सौरभ सद्योजात

‘तुम्हारी औकात क्या है पीयूष मिश्रा’ हे आत्मचरित्र झपाटय़ानं वाचून संपवलं तेव्हा मनात एकच शब्द उमटला, कॉकटेल! चकित करायला लावेल अशा अवस्थांचं, प्रसंगांचं आणि चढ-उतारांचं हे एकत्रित ‘कॉकटेल’ म्हणजे एका विलक्षण झिंगेत काढलेल्या आयुष्याचा आरसाच आहे. विविधरंगी आयुष्याला सामोरं जात, ते उपभोगत, चुका करून ठेचकाळत शेवटी संथ प्रवाहाच्या स्तरावर शांतपणे स्थिर झालेल्या कलावंताचा हा प्रवास आहे. अभिनय, संगीत, गायन आणि चित्रपटलेखन अशी चौफेर मुशाफिरी करणाऱया या चेहऱयामागे दुःख आहे. मस्ती, ऐट आणि बेफिकिरी आहे आणि अखेरीस आलेलं स्थिरावलेपणही आहे. मुळात माणसाची पाळंमुळं कुठून आणि कशा प्रकारची ऊर्जा शोषून घेतात यावरून त्याच्या जीवनप्रवासाची दिशा व गती ठरत असते. मनस्वी आणि कविमनाचे कलावंत म्हणून प्रसिद्ध असलेल्या पीयूष मिश्रांचं हे कादंबरीसदृश आत्मचरित्र एका सैरभैर वावटळीचा स्थिर होत गेलेला प्रवास आहे.

ग्वालियरमधलं बालपण, शहर आणि शाळेच्या छटा, सतत धगधगत असणारं अस्वस्थ कुटुंब आणि त्यात आलेले बरे-वाईट अनुभव यांबाबतचं कथन अगदी विस्तृत आहे. ही पार्श्वभूमी विस्ताराने लिहिण्याचं कारण हेच असावं की, यातून पीयूष यांच्या जगण्यात रोवली गेलेली बरी-वाईट मूल्यं, लोक आणि अनुभव पुढेही त्यांचा हात धरून होते. प्रेमळ आणि प्रिय वाटणाऱया काकूने केलेलं लैंगिक शोषण, धाकटय़ा बहिणीचं झालेलं अकाली देहावसान आणि पहिल्या प्रेमाला लागलेलं नख यातून उत्पन्न झालेली कटुता व भय पुढेही त्यांच्या स्वभावात राहिल्याचं दिसून येतं. कजाग आत्याच्या धाकात धिम्या गतीनं चालणारं कुटुंब आणि नजरा रोखून बघणारं टीचभर ग्वालियर शहर यांबाबत लेखकाची अनास्था अखेर त्यांना दिल्लीच्या एनएसडी या प्रथितयश नाटय़विद्यालयात नेऊन पोहोचवते. तिथलं अस्वस्थ, परंतु सर्जक आयुष्य, फ्रेट्झ बेनेवित्झ्सारख्या दिग्दर्शकाच्या हाताखाली साकारलेला हॅम्लेट, त्यानंतरचा सुवर्णकाळ आणि मग एकदम डोहात पाय पडावा तसा अंधार अशी मजेशीर ‘रोलर कोस्टर राईड’ लेखकाने प्रामाणिकपणे आपल्या पुढय़ात ठेवली आहे. कम्युनिस्ट मित्रांच्या नाटय़संस्थेत केलेले प्रयोग, दारूचं वाढत गेलेलं प्रचंड व्यसन आणि कम्युनिझमने खासगी आयुष्याचं केलेलं अपरिमित नुकसान यांबाबत त्यांनी मांडलेली मते प्रामाणिक, रोखठोक आणि स्पष्ट आहेत. विशिष्ट धर्म आणि वर्गाला झुकतं माप देणारा ‘स्टॅलिनिझम’ मिश्रा यांच्यातल्या बंडखोर कलावंताला खटकत होता, बोचत होता. वाचकाला ही फरपट अनेक पानांवर दिसेल. ती कधी दिल्लीत, तर कधी मुंबईत आहे. कधी नाटकाच्या घोळक्यात, तर कधी घराच्या अंगणात आहे. त्यामागे वैयक्तिक बेशिस्ती, मस्तवालपणा, निष्ठgरता, व्यसनं आणि आत्मपेंद्री वृत्ती असल्याचं ते उघडपणे कबूल करतात व ही प्रामाणिक कबुली या ग्रंथाचा आत्मा आहे हे निश्चित.

पीयूष मिश्रा यांना जाणणारे अनेक रसिक मुख्यतः त्यांच्या कलेला जाणून असतात. ‘आरंभ है प्रचंड’पासून ते ‘बल्लीमारान’मधल्या ‘चिल्ड बियर’च्या संदर्भापर्यंत सगळं त्यांना आवडत असतं. पण अशी वेगळय़ा धाटणीची, मनोवृत्तीची आणि बंडखोरीपूर्ण निर्मिती करणारा हा कलावंत नेमक्या कुठल्या मातीचा बनला आहे आणि त्याआधी किती वेळा मोडून पडला आहे हे पाहण्यासाठी हे पुस्तक अगत्यानं वाचलं पाहिजे. Cherry on the cake म्हणजे या आत्मचरित्रात्मक कादंबरीचा नीता कुलकर्णी यांनी केलेला हा मराठी अनुवाद त्याच तोडीचा आहे. मिश्रा यांच्या लेखनात जाणवणारी ऐट, मस्ती आणि झिंग त्यांनी अगदी चपखलपणे मराठीत उतरवली आहे. गरज असेल तिथे हिंदी शब्द आणि खास दिल्लीच्या ठेवणीतल्या शिव्याही त्यांनी दागिण्यात ठसवलेल्या खडय़ासारख्या तशाच ठेवल्या आहेत. यातून लेखकाचा अनुवादातला आवाज, मूळ भाषेतल्या लेखनाइतकाच बुलंद राहतो हे वाचताना लक्षात येतं. त्यामुळे या अनुवादाचं खरोखर कौतुक केलं पाहिजे.

पीयूष यांचा हा प्रवास अचंबित करून टाकणारा आहेच, पण त्याहून अधिक तो बरेच काही शिकवू पाहणारा आहे. आपल्या जगण्याचे आयाम निश्चित करताना केलेला हलगर्जीपणा आपल्याला कुठल्या वाटेवर नेऊन सोडेल याची शाश्वती नसते. त्या अर्थानं हे एक बोधपर आत्मचरित्र आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. कलाकाराची पाळंमुळं शोधली की, त्याची कला अधिक उमगत जाते. पीयूष यांनी ती आयती उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे एका सशक्त आणि अनवट कलाकाराची कथा समजून घेण्यासाठी हे ‘कॉकटेल’ रिचवून पाहायला हवं. असं केल्यानंतरचा वाचक काहीसा बदललेला असेल हे निश्चित!

[email protected]