चंद्राच्या ध्रुवीय विवरांमध्ये दडलाय बर्फाचा प्रचंड मोठा खजिना!; इस्रोच्या शास्त्रज्ञांची नवी माहिती

हिंदुस्थानच्या चांद्रयान 3 मोहिमेच्या यशानंतर केवळ हिंदुस्थानातच नाही तर, जगभरातून चंद्रावर संशोधन केले जात आहे. मात्र या मालिकेत आता हिंदुस्थानला आणखी एक यश मिळाले आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या संशोधनात एक नवी माहिती समोर आली आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात चंद्राच्या ध्रुवीय विवरांमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फ असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

इस्रोच्या स्पेस ॲप्लिकेशन सेंटरच्या शास्त्रज्ञांनी आयआयटी कानपूर, युनिव्हर्सिटी ऑफ साउथ कॅलिफोर्निया, जेट प्रोपल्शन लॅब आणि आयआयटी (ISM) च्या संशोधकांच्या मदतीने हा अभ्यास केला आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, चंद्राच्या पृष्ठभागाच्या सुमारे दोन-चार मीटर खाली अपेक्षेपेक्षा अधिक बर्फाचे प्रमाण आढळले आहे. पूर्वी केलेल्या गणनेपेक्षा पाच ते आठ पट जास्त बर्फ असू शकतो. बर्फाचा हा खजिना चंद्राच्या दोन्ही ध्रुवांवर आहे. त्यामुळे जमीन खोदून हा बर्फ काढता येऊ शकतो. जेणेकरून भविष्यात मानव चंद्रावर दीर्घकाळ वास्तव्य करू शकेल.

इस्रोच्या मते चंद्राच्या उत्तर ध्रुवावर दक्षिण ध्रुवापेक्षा दुप्पट बर्फ आहे. चंद्राच्या ध्रुवावर बर्फ असल्याच्या वैज्ञानिकांच्या खुलाशानंतर येथे बर्फ कसा तयार झाला? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, चंद्राच्या ध्रुवावरील पाण्याच्या बर्फाचा मुख्य स्त्रोत म्हणजे इम्ब्रियन काळात ज्वालामुखी. या ज्वालामुखीतून बाहेर पडणारा वायू लाखो वर्षांपासून पृष्ठभागाखाली बर्फाच्या स्वरूपात हळूहळू जमा झाला. चंद्रावरील पाण्याचा बर्फ आणि त्याचा प्रसार समजून घेण्यासाठी, इस्रोच्या टीमने रेकोनिसन्स ऑर्बिटरवर रडार, लेसर, ऑप्टिकल, न्यूट्रॉन स्पेक्ट्रोमीटर, अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रोमीटर आणि थर्मल रेडिओमीटरसह सात उपकरणे वापरली आहेत.