व्हेरिएंट हातपाय पसरतोय; दिवसभरात नऊ नवे रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पूर्ण नियंत्रणात आलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा एकदा हातपाय पसरायला सुरुवात केली असून आज एकाच दिवसात जेएन-1 कोरोना व्हेरिएंटचे 9 रुग्ण आढळले आहेत. यामुळे राज्यातील नव्या जेएन-1 व्हेरिएंटच्या एकूण रुग्णांची संख्या 10 झाली आहे. सिंधुदुर्गात नवा व्हेरिएंट सापडल्यानंतर आज ठाणे महापालिका हद्दीत 5, पुणे महापालिका हद्दीत 2, पुणे जिल्हा आणि अकोला महापालिका हद्दीत प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

देशात जेएन-1 व्हेरिएंटचा पहिला रुग्ण केरळमध्ये सापडला होता. त्यानंतर या व्हेरिएंटचे गोव्यात काही रुग्ण आणि महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिह्यात एक रुग्ण आढळला होता. रविवारी आढळलेल्या 9 रुग्णांत पुण्यातील एका रुग्णाचा समावेश असून तो अमेरिकेतून आल्याची नोंद आहे. तसेच यापूर्वी सिंधुदुर्ग जिह्यात रुग्ण आढळला होता. रुग्णांची लक्षणे सौम्य असून ते उपचारातून बरे होत असल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी ठाणे पालिका क्षेत्रात 5 रुग्ण, तर पुणे पालिका क्षेत्रात 2, तर पुणे ग्रामीण क्षेत्रात 1 आणि अकोला पालिका क्षेत्रात 1 असे 9 रुग्ण आढळले. यापैकी 8 पुरुष तर 1 महिला आहे. यातील एक रुग्ण 9 वर्षांचा मुलगा असून 21 वर्षांच्या तरुणीलाही संसर्ग झाला आहे, तर एक जण 28 वर्षांचा तरुण असून उर्वरित 6 जण 40 वर्षांवरील नागरिक असल्याचे सांगण्यात आले.

लस घेऊनही कोरोना
रविवारी आढळलेल्या नव्या व्हेरिएंटच्या रुग्णांमधील 8 जणांनी कोरोना लस घेतली असल्याचे समोर आहे. या सर्वांना सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे सर्व घरात विलगीकरणात असल्याचे सांगण्यात आले.

राज्यभरात मॉकड्रील
– राज्यामध्ये कोविड पूर्वतयारी करण्यात आली आहे. त्यात सर्व जिह्यांतील आरोग्य संस्थांचे मॉकड्रील घेण्यात आले आहे. त्यात द्वितीय आणि तृतीय स्तरावरील सर्व आरोग्य संस्थांचा समावेश आहे. सर्व जिल्हे, महापालिका आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांनी या मॉकड्रीलमध्ये सहभाग नोंदविला.
– रुग्णालयातील उपलब्ध खाटा, अतिदक्षता विभाग, सुविधा, यंत्रसामग्री, ऑक्सिजन सुविधा, औषध साठा, मनुष्यबळ, मनुष्यबळाचे प्रशिक्षण, टेलिमेडिसीनची सुविधा याबाबत रुग्णालयांचा आढावा घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.