
दहावीचे वर्ष आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष असते असे म्हणतात. शाळा संपून कॉलेजकडे पावले वळायला लागतात. पुढच्या शैक्षणिक भविष्याची पायाभरणी ठरवणारे दहावीचे वर्ष मंतरलेल्या दिवसांची साठवण असते. या शालेय दिवसांवर आधारित ‘दहावी अ’ ही सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
अभ्यासाइतकीच विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील अविस्मरणीय गमती-जमतीचं चित्रण असणाऱ्या ‘मीडिया वन सोल्युशन्स’ प्रस्तुत, ‘इट्स मज्जा’ व ‘कोरी पाटी’ प्रॉडक्शनच्या “दहावी अ’ या नव्या-कोऱ्या सीरीजचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच साताऱ्यातील शाहू कलामंदिरमध्ये पार पडला. ‘इट्स मज्जा’चे शौरीन दत्ता, क्रिएटिव्ह हेड अंकिता लोखंडे, सीरिज दिग्दर्शक नितीन पवार व मुख्य कलाकारांच्या उपस्थितीत हा खास सोहळा पार पडला. ‘आठवी अ’ या सिरिजचा चाहता वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. यामध्ये अथर्व अधाटे, सृष्टी दणाणे , ओम पानसकर, संयोगिता चौधरी, श्रेयश कटके, सत्यजित होमकर व रुद्र इनामदार या कलाकारांची प्रमुख भूमिका असून 6 जानेवारी पासून सोमवारी व गुरुवारी दुपारी दीड वाजता ‘इट्स मज्जा’च्या युट्यूब चॅनेलवर ‘दहावी अ’ प्रेक्षकांना पाहता येणार आहे.





























































