
दादरच्या इंदू मिलमध्ये राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य जागतिक दर्जाच्या स्मारकाचे काम 52 टक्के पूर्ण झाले असून बाबासाहेबांच्या पुतळय़ाचे 230 फुटांपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. प्रख्यात मूर्तिकार राम सुतार यांच्या हस्ते दिल्ली येथे बाबासाहेबांच्या पुतळय़ाचे काम सुरू आहे, अशी माहिती एमएमआरडीएने दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला 2018 मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यानंतर राज्य सरकारने शापूरजी पालनजी या कंत्राटदाराची स्मारकाच्या उभारणीसाठी नियुक्ती केली. प्रकल्पाचे सल्लागार मे. शशी प्रभू अँड असोसिएट्स आहेत.
स्मारक 2025 च्या अखेरीला होणार पूर्ण
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ाची एकूण उंची 350 फूट असून त्याखालील पादपीठाची उंची 100 फूट आहे. सध्या पुतळय़ाचे काम 230 फुटांपर्यंत पूर्ण झाले आहे. इमारत प्रवेशद्वाराचे 88 टक्के, व्याख्यान वर्ग 77 टक्के, ग्रंथालय 80 टक्के, प्रेक्षागृह 63 टक्के, बेसमेंट वाहनतळ 95 टक्के पूर्ण झाले आहे. प्रकल्पाचा अंदाजित खर्च 1 हजार 89 कोटी 95 लाख असून आतापर्यंत प्रकल्पावर 37 टक्के खर्च झाला आहे. हे स्मारक 31 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती एमएमआरडीएने दिली.
स्मारकाची वैशिष्टय़े
- स्मारक संकुलाची संकल्पना बौद्ध वास्तूरचना शैलीवर आहे.
- इमारतीच्या पादपीठामध्ये शैलीदार घुमट, संग्रहालय, प्रदर्शन भरवण्याची व्यवस्था.
- स्मारकात 68 टक्के खुली हरित जागा ठेवणार.
- संशोधन केंद्रामधील ग्रंथालयात त्यांच्याबद्दलची पुस्तके, लेख, जीवनचरित्र, माहितीपट आणि बाबासाहेबांच्या सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय योगदानावर संशोधन करण्याची व्यवस्था असेल.
- 100 लोकांची आसन क्षमता असलेले 4 व्याख्यान वर्ग.
- हजार लोकांची क्षमता असलेले प्रेक्षागृह, ध्यानधारणा केंद्र, चवदार तळ्याची प्रतिकृती.



























































