फलंदाजांमुळे मुंबई संकटात; सूर्या, शिवम शून्यावर, मुंबईचे 4 फलंदाज 5 धावांत गारद

भरवशाच्या फलंदाजांनी मुंबईला पुन्हा एकदा संकटात ढकलले आहे. सर्वाधिक 42 वेळा रणजीच्या झळाळत्या करंडकावर नाव कोरणारा मुंबईचा संघ आपल्या फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे दुसऱ्या दिवसअखेर 7 बाद 188 अशी बिकट अवस्थेत सापडला आहे. पहिल्या डावात 383 धावा करणाऱ्या विदर्भाने मुंबईच्या फलंदाजांना धडाधड बाद करीत सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे. पार्थ रेखाडेच्या अफलातून फिरकीपुढे मुंबईच्या आघाडीच्या 4 फलंदाजांनी 5 धावांत माती खाल्ल्यामुळे मुंबई 195 धावांनी पिछाडीवर आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सलामीवीर आकाश आनंद 67, तर तनुष कोटियन 5 धावांवर खेळत होता. मुंबईला सामन्यात कमबॅक करायचे असेल तर संकटमोचक तनुष कोटियनला पुन्हा एकदा झुंजार खेळ करावा लागेल.

आज विदर्भाला चारशेपार धावांपासून रोखण्यात यशस्वी ठरलेल्या मुंबईने फलंदाजीत घोर निराशा केली. सलामीवीर आकाश आनंदने नाबाद अर्धशतकी खेळी करत एकाकी झुंज दिली. दर्शन नळकांडेने आयुष म्हात्रेला (9) मालेवरकरवी झेलबाद करून विदर्भाला सनसनाटी सुरुवात करून दिली. मग आकाश आनंद व सिद्धेश लाड (35) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी करीत मुंबईला सावरण्याचा प्रयत्न केला. यश ठाकूरने सिद्धेशचा त्रिफळा उडवून विदर्भाला दुसरे यश मिळवून दिले.

शिवम दुबेचा ‘पंच’

दरम्यान, विदर्भाने पहिल्या दिवसाच्या 5 बाद 308 धावसंख्येवरून मंगळवारी सकाळी पुढे खेळायला सुरुवात केली, मात्र मुंबईने विदर्भाला चारशेच्या आता गुंडाळण्यात यश मिळविले. यश राठोड (54) व अक्षय वाडकर (34) बाद झाल्यानंतर शिवम दुबेने शेपटाला झटपट गुंडाळून विदर्भाला 383 धावांवर रोखले. त्याने हर्ष दुबे (18), नचिकेत भुते (11) व यश ठाकूर (3) यांना बाद केले, तर दर्शन नळकांडे 12 धावांवर नाबाद राहिला. मुंबईकडून शिवम दुबेने 5 फलंदाज बाद केले, तर रॉयस्टन डायस व शम्स मुलांनी यांना 2-2 विकेट मिळाल्या. शार्दुल ठाकूरला एक विकेट मिळाली.