आशिया कप खेळणार नाही ही निव्वळ अफवा, बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांचा खुलासा

पुरुषांच्या आणि महिलांच्या आगामी आशिया कप स्पर्धांमध्ये हिंदुस्थानचे क्रिकेट संघ खेळणार नसल्याचे वृत्त वाऱयासारखे पसरले आणि क्रिकेटविश्वात खळबळ माजली, पण बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकियांनी याप्रकरणी खुलासा करत ही निव्वळ अफवा असल्याचे सांगितले आणि काल्पनिक वादळ क्षणार्धात शमले.

सध्या आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) नेतृत्व पाकिस्तानी क्रिकेट मंडळाचे (पीसीबी)अध्यक्ष मोहसीन नक्वी करत आहेत आणि या आगामी आशिया कप आणि महिला एमार्ंजग टीम आशिया कप या स्पर्धा एसीसीच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत. त्यामुळे हिंदुस्थानने स्पर्धेतून माघार घेतल्याचे वृत्त पसरले होते. या माघारीला पहलगाम हल्ल्याचा संबंध जोडण्यात आला. विशेष म्हणजे पुरुषांचा आशिया चषक हिंदुस्थानात खेळविला जाणार आहे तर महिलांच्या स्पर्धेचे यजमानपद श्रीलंकेला देण्यात आले आहे.

आज सकाळपासूनच हिंदुस्थानने आशिया चषकातून माघार घेतल्याचे वृत्त होते. मात्र याबाबत सचिव सैकिया यांनी खुलासा केला आणि या माघारीला अफवा असल्याचे सांगितले. आमचे संघ खेळणार नसल्याचे वृत्त माझ्याही कानावर पडले. पण हे या केवळ अफवा आहेत आणि या वृत्तांना कोणताही आधार नाही. यात काहीही तथ्य नाही. आम्ही एसीसीशी याबाबत साधी चर्चाही केलेली नाही. त्यामुळे पत्रव्यवहाराचा संबंधही येत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या आम्ही आयपीएल आणि हिंदुस्थानच्या आगामी इंग्लंड दौऱयाचाच विचार करत आहोत. या गोष्टी वगळत्या बीसीसीआयकडे दुसऱया कोणत्याही गोष्टीचा विचार करण्यासाठीही वेळ नाहीय. त्यामुळे जे वृत्त आहे, ते काल्पनिकच आहे. मात्र बीसीसीआय याबाबत जेव्हा कधी एसीसीशी आशिया कप स्पर्धेबाबत कोणतीही चर्चा करील आणि कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेईल तेव्हा त्याची घोषणा मीडियासमोर केली जाईल, असे सैकिया यांनी आवर्जून सांगितले.