
देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई रविवारी मुंबईत आले असताना त्यांच्या स्वागतासाठी शिष्टाचाराप्रमाणे कुणीही वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित नव्हता. त्याबद्दल गवई यांनी नाराजी व्यक्त केली होती. यातच आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राष्ट्रपति द्रौपदी मुर्मु यांना प्रोटोकॉल न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. X वर एक पोस्ट करत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
X वर एक पोस्ट करत नाना पटोले म्हणाले आहेत की, “हिंदुस्थानचे नवनियुक्त सरन्यायाधीश भूषण गवई महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असताना, राज्य सरकार व प्रशासकीय यंत्रणेकडून त्यांच्या स्वागतात आणि सुरक्षेत आवश्यक असलेला प्रोटोकॉल पाळण्यात आला नाही. केवळ त्यांच्या व्यक्तिगतरित्या झालेल्या दुर्लक्षापुरतेच हे प्रकरण मर्यादित नाही, तर हा प्रकार थेट देशाच्या संविधानाच्या प्रतिष्ठेवर आघात करणारा ठरतो. सरन्यायाधीश गवई हे आंबेडकरी विचारांचे आहेत म्हणून त्यांचा महाराष्ट्रात अपमान केला आहे का? हा देखील प्रश्न उपस्थित होतो.”
ते म्हणाले, “माननीय सरन्यायाधीशांनी स्वतः आपल्या भाषणातून राज्य सरकारच्या आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यांच्या या विधानामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या प्रकरणाकडे वळले आहे. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर आज महामहीम राष्ट्रपतींना पत्र लिहून प्रोटोकॉल न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.”