म्हाडाच्या 96 उपकरप्राप्त इमारती अतिधोकादायक, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जाहीर केली यादी

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे मुंबई शहरातील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे नियमित पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षी 96 इमारती अतिधोकादायक आढळून आल्या असून यात मागील वर्षी अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या दोन इमारतींचा समावेश आहे.

मुंबईत सध्या 13 हजारहून अधिक उपकरप्राप्त इमारती असून त्या 80 ते 100 वर्षे जुन्या आहेत. पावसाळ्यात या इमारती कोसळून जीवित किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडूनतर्फे सर्वेक्षण करून धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. म्हाडाच्या अधिकारी आणि कर्मचाऱयांना आवश्यकतेनुसार इमारती रिक्त करण्याकामी सहकार्य करावे व स्वतःच्या व आपल्या इतरांच्या सुरक्षेकरिता दिलेल्या सूचनांचे पालन करावे. मंडळाचा नियंत्रण कक्ष अहोरात्र कार्यरत असल्याने इमारतीमध्ये कोणतीही धोक्याची लक्षणे तथा अपघात घडल्यास नियंत्रण कक्षास सूचित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई इमारत दुरुस्ती पुनर्रचना मंडळाचा नियंत्रण कक्ष

रजनी महल, पहिला मजला, 89-95, ताडदेव रोड, ताडदेव
दूरध्वनी – 23536945, 23517423 किंवा 9321637699
पालिका नियंत्रण कक्ष, फोर्ट, दूरध्वनी – 22694725/27

दरडप्रवण क्षेत्रात रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी संरक्षक भिंत

मुंबई शहरासह उपनगरात मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढल्यामुळे डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या पश्चिम उपनगरातील दिंडोशीमधील पिंपरीपाडा, दहिसरमधील शांतीनगर, नवागाव, कांदरपाडा, बोरिवलीतील कस्तुरी पार्क, अंधेरीतील मिलिंद नगर, सुभाष नगर, मॉडेल टाऊन आदी भागात राहणाऱया झोपडीधारकांवर दरडी कोसळण्याची टांगती तलवार असते. म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी येथे नऊ मीटर उंचीच्या संरक्षक भिंत उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरात लवकर ही कामे पूर्ण केली जातील, अशी माहिती म्हाडाकडून देण्यात आली आहे.

3162 रहिवाशांचा जीव टांगणीला

म्हाडाने जाहीर केलेल्या अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींमध्ये 2577 निवासी व 585 अनिवासी असे एकूण 3162 रहिवासी आहेत. 2577 रहिवाशांची संक्रमण शिबिरात व्यवस्था करावी लागणार असल्याने मंडळातर्फे त्याबाबत कार्यवाही सुरू आहे. मंडळातर्फे 184 निवासी गाळेधारकांना गाळे खाली करण्याकरिता नोटीस बजावली आहे. त्यापैकी तीन रहिवासी संक्रमण शिबिरामध्ये स्थलांतरित झाले आहेत. नोटीस देऊनही गाळे खाली न केलेल्या निवासी गाळय़ांची संख्या 176 आहे. उर्वरित इमारतीमधील रहिवाशांना निष्कासनाच्या सूचना दिल्या आहेत.