मोदींच्या ‘अमृत भारत’चा पोकळ दिखावा! रेल्वे स्थानकांची नुसतीच रंगरंगोटी, सुविधांची बोंब; कोट्यवधीची उधळपट्टी करूनही प्रवासी, दिव्यांगांचे हाल ‘जैसे थे’

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी देशातील 103 ‘अमृत भारत’ रेल्वे स्थानकांचे लोकार्पण करणार आहेत. यात मुंबईतील चार स्थानकांचा समावेश आहे. या योजनेचा मोठा गवगवा केला जात आहे. वास्तवात मात्र रेल्वे स्थानकांची नुसतीच रंगरंगोटी, किरकोळ सुविधांचे बांधकाम वगळता मूलभूत सुविधांची बोंब आहे. कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी करूनही दिव्यांग, वृद्ध, रुग्णांसह इतर प्रवाशांच्या समस्या ‘जैसे थे’ आहेत. त्यामुळे भाजप सरकारच्या दिखाऊ योजनेवर मुंबईकर तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.

अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत मुंबईतील मध्य रेल्वेवरील परळ, चिंचपोकळी, माटुंगा व वडाळा या स्थानकांचा समावेश आहे. स्थानकांच्या पुनर्विकासासाठी तब्बल 138 कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला आहे. स्थानकांचा लोकार्पण सोहळा तसेच जाहिरातीबाजीवर केल्या जात असलेल्या खर्चाच्या तुलनेत निम्मा निधी तरी प्रवाशांच्या सुविधेवर खर्च केला का, असा प्रश्न पडतो, अशी प्रतिक्रिया मध्य रेल्वे प्रवासी रोहन कुलथे याने दिली.

रेल्वे स्थानक पुनर्विकासाच्या

नावाने उधळपट्टी

परळ 19.41 कोटी
चिंचपोकळी 11.81 कोटी
वडाळा रोड 23.02 कोटी
माटुंगा 17.28 कोटी

(चारही स्थानकांत लोकार्पण सोहळा आणि जाहिरातबाजीवर केलेला खर्च वेगळा)

अमृत भारत स्थानकांत या समस्या ‘जैसे थे’

  • दिव्यांगांसाठी मूलभूत सुविधांची वानवा
  • ठिकठिकाणी कचऱयाचे साम्राज्य, स्वच्छतेचा बोजवारा
  • परळ स्थानकात अरुंद पुलावरूनच रुग्ण, दिव्यांगांची ये-जा.
  • रेल्वे स्थानकात चांगल्या आसनव्यवस्थेची कमतरता
  • प्लॅटफॉर्म आणि फूटबोर्डमध्ये जीवघेणी पोकळी
  • महिला प्रवाशांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष
  • स्वच्छतागृहांची योग्य देखभाल नाही
  • पिण्याच्या शुद्ध पाण्याची उपलब्धता नाही