Jammu Kashmir – किश्तवाडमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत महाराष्ट्रातील जवान शहीद

जम्मू आणि कश्मीरच्या किश्तवार जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत एक जवान शहीद झाला असून दोन जवान जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. संदिप पांडुरंग गायकर असे शहीद जवानाचे नाव असून ते महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील करंदी तहसील गावचे रहिवासी असल्याचे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. लष्कराच्या व्हाईट नाईट कॉर्प्सच्या माहितीनुसार, चकमकीनंतर अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आले असून संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.

किश्तवाडमधील सिंगपोरा चतरू परिसरात जैश-ए-मोहम्मद (जेईएम) चे तीन ते चार दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने गुरुवारी सकाळी या परिसरात ‘ऑपरेशन त्राशी’ राबवले. गुरुवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास, लष्कराच्या पॅरा स्पेशल फोर्सेस, 11 आरआर, 7 वी आसाम रायफल्स आणि एसओजी किश्तवार यांच्या संयुक्त पथकाने शोध मोहीम सुरू केली. या दरम्यान, सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली.