
घाटकोपर-वर्सोवादरम्यान धावणाऱ्या मेट्रो-1 च्या स्थानकांत पीक अवर्सला प्रचंड गर्दी होत आहे. अंधेरी, घाटकोपर, मरोळ आदी स्थानकांत प्रवाशांना बराच वेळ लांबलचक रांगांचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. इथे चेंगराचेंगरीसारखी संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी ट्रेनच्या डब्यांची संख्या वाढवण्याची मागणी प्रवाशांमधून जोर धरत आहे.
मुंबईत होणाऱ्या वाहतूककोंडीवर तोडगा म्हणून जून 2014 मध्ये घाटकोपर-वर्सोवादरम्यान पहिली मेट्रोसेवा सुरू करण्यात आली. दहा वर्षांत या मेट्रो मार्गिकेच्या प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ झाली. त्या तुलनेत मेट्रो मार्गिका व ट्रेन्सचे अद्ययावतीकरण केलेले नाही. त्यामुळे सध्या मेट्रो स्थानकांच्या प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना दाटीवाटीने उभे राहावे लागत आहे. अधिक प्रवासी संख्या व अपुरे प्लॅटफॉर्म अशी स्थिती मेट्रो स्थानकांमध्ये दिसत आहे. ट्रेनदेखील प्रवाशांनी खचाखच भरलेल्या असतात. ऑटोमॅटिक अॅक्सेस कंट्रोल सिस्टमजवळ प्रवाशांच्या लांबलचक रांगा लागत आहेत. यावर उपाय म्हणून मेट्रो ट्रेन्सच्या डब्यांची संख्या वाढवण्यासाठी सरकारने सेवा ऑपरेटर कंपनीला सूचना कराव्यात, अशी मागणी नियमित प्रवाशांकडून केली जात आहे.
प्रवाशांची मागणी
ट्रेनच्या डब्यांची संख्या वाढवण्याबरोबरच मेट्रोच्या फेऱ्या वाढवाव्यात, प्लॅटफॉर्म अपुरे पडत असल्याने त्यांच्या अद्ययावतीकरणाचा विचार व्हावा, गर्दी टाळण्यासाठी नियोजन करावे आदी मागण्या नियमित प्रवासी करीत आहेत. सध्या या मार्गिकेवर दर 5 ते 6 मिनिटांच्या फरकाने मेट्रो ट्रेन धावतात. त्याऐवजी दर 3 मिनिटांनी ट्रेन चालवण्याची मागणी करण्यात येत आहे.
सरासरी नियमित प्रवासी संख्या
घाटकोपर स्थानक – 1,14,500
अंधेरी स्थानक – 83,000
मरोळ नाका/ साकीनाका – 40,000
संपूर्ण मार्गिकेवरील प्रवासी – 4,55,000