
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी ईडी हे नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजपचे शस्त्र आहे. गेल्या 10 वर्षात त्यांनी ईडीचा राजकीय गैरवापर केला. त्यावरच सर्वोच्च न्यायालयाने बोट ठेवत ईडीने सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत, त्यांनी एवढे अधिकार कोणी दिले, असा संताप व्यक्त केला आहे. तसेच सरकारकडे सक्षम नेते नसल्याने त्यांनी विरोधी पक्षातील सक्षम नेत्यांना निवडून त्यांचे शिष्टमंडळ परदेशात पाठवले, असेही संजय राऊत म्हणाले.
गेल्या 10 वर्षात मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांनी ईडीचा राजकीय गैरवापर केला. आपल्या राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी, पक्ष फोडण्यासाठी, राजकीय खंडणी गोळी करण्यासाठी ईडीचा गैरवापर केला. यावर सर्वोच्च न्यायालयाने बोट ठेवले. ईडीने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, असे न्यायालयाने म्हटले आहे. ईडीने संघराज्याच्या संकल्पनेवर हातोडा मारला. राज्यांच्या हक्कांवर अतिक्रमण करण्याचा अधिकार ईडीला कोणी दिला? आता काल 2 कोटींची रक्कम सापडली, तिथे ईडी का पोहचली नाही, विरोधकांच्या 5 ,50 हजाराच्या चौकशीसाठी ईडी पोहचते, तर मग दोन कोटी सापडलेल्या ठिकाणी ईडी का पोहचली नाही? असा सवाल करत ईडी हा फक्त सरकारचा पिंजऱ्यातला पोपट आहे, असेही ते म्हणाले.
ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी मोदी सरकारला सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवावे लागले म्हणजे त्यांच्या पक्षात त्या क्षमतेचे नेते नाही, हे दिसून येते. त्यांच्या पक्षात फक्त ट्रोलर्स आहेत. त्यामुळे विरोधी पक्षातील सक्षम नेते त्यांनी शिष्टमंडळात घेतले. केंद्रीय यंत्रणा देशाची बाजू परदेशात मांडण्यात अपयशी ठरली आहे. मोदी यांनी अनेक परदेश दौरे केले. अनेक नेत्यांची गळाभेट घेतली, ते स्रव अपयशी ठरले आहे. मात्र, त्यांच्यावर कोणा विश्वास ठेवायला तयार नाही, त्यांचे कोणी ऐकायला तयार नाही. एस. जयशंकर यांचेही कोणी ऐकायला तयार नाही. त्यामुळे विरोधी पक्षातील आश्वासन चेहऱ्यांना घेत त्यांना शिष्टमंडळ पाठवावे लागत आहे. त्यांनी ज्या पद्धतीने नेते निवडले ती पद्धत अयोग्य असल्याचे आमचे म्हणणे होते. त्यांनी प्रत्येक पक्षप्रमुखांशी चर्चा करून नावे ठरवण्याची गरज होती. कदाचित यापेक्षा वेगळी नावे त्यांनी मिळाली असती. देशाचे माजी राष्ट्रपती, माजी उपराष्ट्रपती, माजी लोकसभा अध्यक्ष यांचा समावेश शिष्टमंडळात असायला हवा होता. तर त्या शिष्टमंडळाला वजन प्राप्त झाले असते. आता त्यांनी निवडले आणि त्यांनीच पाठवले, असे संजय राऊत म्हणाले.
पाकिस्तानवर आपण कसा विश्वास ठेवला, असा सवाल लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. सर्व देशवासियांचा मनातही हाच प्रश्न आहे. त्याचे उत्तर मोदी यांनी द्यावे. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी काय दिले म्हणून त्यांच्या शब्दाखातर शस्त्रबंदी जाहीर करण्यात आली, याचे उत्तर देसवासियांना मिळायला हवे. दहशतवादाविरोधात युद्ध थांबवून ट्रम्प यांनी आपले नुकसानच केले आहे. आमच्या शरीरात देशभक्तीचे रक्त आहे. अशा गोष्टींमुळे आमचा संताप होतो, त्यामुळे राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळायलाच हवी. आम्ही 1971 चा बदला घेतला आहे, अशी वक्तव्ये पाकिस्तान करत आहे, असे वक्तव्य करण्याची त्यांची हिंमत कशी होते. याची या सरकारला लाज वाचली पाहिजे, असेही संजय राऊत म्हणाले.