
हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिह्यातील छोंझिन अंगमो ही माउंट एव्हरेस्ट सर करणारी हिंदुस्थानातील पहिली आणि जगातील पाचवी अंध महिला ठरली आहे. तिने ऐतिहासिक कामगिरी करत सर्वात उंच पर्वतावर तिरंगा फडकवला. वयाच्या आठव्या वर्षी दृष्टी गमावलेल्या छोंझिनने हिंमत न हारता केवळ जिद्दीच्या जोरावर इतिहास रचला. माउंट एव्हरेस्टवर चढाई केल्यानंतर उर्वरित शिखरेदेखील गाठायची असल्याचे तिने सांगितले. अंगमोचा जन्म हिंदुस्थान-तिबेट सीमेजवळील किन्नौर जिह्यातील चांगो गावात झाला. तिने दिल्ली विद्यापीठातून पदवी आणि पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले. सध्या छोंझिन अंगमो दिल्लीतील बँकेत कार्यरत आहे. अंधत्व ही माझी कमजोरी नसून माझी ताकद आहे. या कमजोरीला ढाल बनवून पर्वत चढणे हे बालपणीचे स्वप्न होते, परंतु आर्थिक अडचणी हे एक मोठे आव्हान होते. आगामी काळात उर्वरित शिखरे सर करण्यासाठी प्रयत्न करेन, असे ती म्हणाली.
मुलीचा सार्थ अभिमान
आपल्या लेकीच्या यशाबद्दल बोलताना अंगमोचे वडील अमर चंद भावुक झाले. ते म्हणाले की, मला अद्याप फारशी माहिती मिळाली नाही. पण मी तिच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत आहे, तिचा सार्थ अभिमान वाटतो. ती लहानपणापासूनच धाडसी आणि दृढनिश्चयी होती. दृष्टिहीन असतानाही प्रत्येक आव्हानाचे संधीत रुपांतर करण्यात तिने यश मिळवले. अंगमो हिला सुरुवातीपासूनच खेळात कमालीचा रस होता. तिने राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. याशिवाय राष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉन स्पर्धांमध्ये दोन कांस्य पदके जिंकली आहेत.