
धनंजय मुंडे यांची सगळी लाइन क्लीअर होऊन त्यांना क्लीन चिट मिळाली आणि त्यांना मंत्रिमंडळात घेण्याचा निर्णय झाला तर आपण मंत्रीपदाचा राजीनामा देऊ, असे विधान अन्न व औषध प्रशासन मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांना अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या मंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले आहे. त्यांच्या जागी छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या मंत्रीपदाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर ते एका खासगी टीव्ही चॅनेलशी बोलत होते.
फडणवीस यांच्या सरकारमध्ये अजित पवार यांच्यापासून अनेक जणांना क्लीन चिट मिळाली आहे. त्यामुळे मुंडे यांनाही क्लीन चिट मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे, याबाबात प्रश्न भुजबळ यांना विचारण्यात आला होता. त्यावर, धनंजय मुंडे यांना भविष्यात मंत्रिमंडळात घेण्याचे ठरले तर माझी काही हरकत नाही. मी मंत्रीपदाचा राजीनामा देईन; पण मला या मंत्रिमंडळात सन्मानपूर्वक बोलावण्यात आले आहे.
सुप्रिया सुळेंना अध्यक्षपद
शरद पवार यांनी जेव्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा सुप्रिया सुळेंना पक्षाचे अध्यक्ष करून सरकारमध्ये जायचे असे ठरले होते. यामध्ये शरद पवार कुठेही असणार नाहीत. युतीची सर्व चर्चा करायला जयंत पाटील, अजित पवार व प्रफुल पटेल, अनिल देशमुख जात होते. भाजपसोबत जायचे म्हणून आमच्या अनेक बैठका झाल्या, असा दावाही त्यांनी केला.
…तर भुजबळ तिसरे उपमुख्यमंत्री होतील – गिरीश महाजन
अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी मोठे वक्तव्य केले आहे. छगन भुजबळ नाशिकचे पालकमंत्री होतील का, या विधानावर बोलताना ते म्हणाले की, ‘चांगलं आहे, दावा करणे यात काही वाईट आहे असे मला वाटत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवले तर काहीही होऊ शकते. छगन भुजबळ तिसरे मुख्यमंत्रीदेखील होऊ शकतात.’ हे सर्व फडणवीस यांच्या हातात आहे, असे ते प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.