भाजप सरकारच्या उदासीनतेमुळे आज मुंबई ठप्प झाली; आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

पावसाळा सुरू झाला तरी मुंबईतील रस्त्यांची कामे अर्धवट स्थितीत आहे. तसेच नालेसफाईदेखील पूर्ण झालेली नाही, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी रविवारी म्हटले होते. तसेच सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने रेल्वे सेवा, वाहतूकीसह मुंबई ठप्प झाली आहे. या परिस्थितीला भाजप सरकारची उदासीनता जबाबदार आहे, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, गेल्या 3 वर्षांपासून बीएमसीवर नियंत्रण ठेवणाऱ्या भाजप सरकारच्या पूर्ण उदासीनतेमुळे आज मुंबई ठप्प झाली आहे. मुंबईमध्ये अशा ठिकाणी पाणी साचले आहे जिथे यापूर्वी कधीही पाणी साचले नव्हते. 2021- 22 मध्ये आपण ज्या हिंद माता परसिर पाणी साचण्यापासून मुक्त केला होता. त्या परिसरातही आज पुन्हा पाणी साचले आहे कारण मुंबई महापालिकेने योग्य वेळी पाणी उपसण्याची प्रक्रिया सुरू केली नाही.

गेल्या आठवड्यात अंधेरी सबवे आणि साकीनाका परिसरात पाणी साचले होते. मात्र, आता असे अनेक भाग आहेत जिथे भाजपच्या उदासीनतेचा फटका जनतेला बसत आहे. भाजपला मुंबईचा इतका द्वेष का आहे, असा सवालही त्यांनी केला. मुंबईतील अर्धवट असलेले रस्त्यांचे काम, पूर्ण न झालेली नालेसफाई यामुळेच यापूर्वी कधीही पाणी न साचलेल्या भागात पाणी साचले आहे. भाजपच्या उदासीनतेचा मुंबईला मोठा फटका बसला आहे, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.