
अयोध्येतील प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी देशभरातून दररोज हजारो भाविक हजेरी लावतात. भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा उठवत रामलल्लाच्या प्रसादाच्या नावाखाली कोटय़वधी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. अयोध्या पोलिसांनी या घोटाळय़ाचा पर्दाफाश केला असून भाविकांना ऑनलाईन गंडा घालणाऱ्या ठगाला अटक केली आहे. आशिष सिंग असे आरोपीचे नाव आहे.
गाझियाबाद येथील रहिवासी असलेल्या आशीष सिंगने सोशल मीडियाच्या माध्यमातून रामभक्तांना आपल्या जाळय़ात खेचले. यासाठी त्याने बनावट वेबसाईट सुरू केली आणि भक्तांना त्यांच्या घरात रामलल्लाचा प्रसाद पोहोच केला जाईल, असे सांगून कोटय़वधी रुपये उकळले. अशा प्रकारे त्याने तब्बल 3 कोटी 85 लाख रुपयांचा गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. त्याने 19 डिसेंबर 2023 ते 12 जानेवारी 2024 या कालावधीत देशविदेशातील सहा लाखांहून रामभक्तांकडून ऑर्डर मिळवली आणि प्रसादाच्या नावाखाली पैसे उकळल्याचे अयोध्या पोलिसांनी सांगितले.