निवडणूक आयोगाची माघार, महाराष्ट्र आणि हरयाणाच्या मतदारांचा डेटा देणार

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकतेच वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहून महाराष्ट्र, हरयाणासह इतर राज्यांतील विधानसभा निवडणुका कशा फिक्स करण्यात आल्या याबाबत आकडेवारी देऊन आरोप केले होते. यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली होती. यानंतर हास्यास्पद खुलासे करत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करणाऱया केंद्रीय निवडणूक आयोगाने आता झुकती भूमिका घेत महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकांच्या मतदार याद्यांचा डेटा शेअर करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र, हरयाणा, दिल्ली आदी राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालाबाबत राहुल गांधी सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. भाजपला अनुकूल स्थिती नसलेल्या राज्यांत निवडणूक आयोगाच्या मदतीने निवडणुका फिक्स करण्यात आल्या. त्यासाठी मतदार यादीत मोठय़ा प्रमाणात बोगस मतदारांची नावे घुसवण्यात आली. मतदानाच्या आकडेवारीत फेरफार करून मतदानाचा टक्का वाढवला. भाजपला जिंकायचे होते अशा मतदारसंघात बोगस मतदान घडवून आणण्यात आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी देशभरातील अकरा वर्तमानपत्रांत लिहून केला होता. तसेच लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुकांतील एकत्रित, डिजिटल आणि मशीन-रिडेबल मतदार यादी जाहीर करा, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतदान पेंद्रांवरील संध्याकाळी 5 नंतरचे सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करा, अशी मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार तसेच काँग्रेसने यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेला अनुसरून महाराष्ट्र आणि हरयाणा या विधानसभा निवडणुकांसाठीच्या मतदार याद्यांचा डेटा शेअर करण्याचे निवडणूक आयोगाने मान्य केले आहे. राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.

– मतदार याद्यांचा डेटा शेअर करण्याच्या निर्णयाचे स्वागत करत राहुल गांधी यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. मतदार याद्या देण्यासाठीचे पहिले पाऊल टाकले आहे; पण निवडणूक आयोग कुठल्या तारखेपासूनचा डिजिटल आणि मशीन रिडेबल फॉरमॅटमधला हा डेटा शेअर करणार आहे याची नेमकी तारीख जाहीर करता येईल का, अशी विचारणा राहुल गांधी यांनी एक्स पोस्ट करत केली आहे.