
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीला भारतमातेच्या रूपात दाखवण्याचा महायुती सरकारचा डाव आज उधळला गेला. तुळजापूर विकास प्रकल्प आराखडय़ामध्ये 108 फूट उंचीचे शिल्प उभारले जाणार आहे. भवानीमाता छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देतेय असे ते शिल्प आहे. परंतु आराखडय़ात दाखवलेल्या संकल्पचित्रामध्ये शिल्पातील भवानीमाता भारतमातेच्या स्वरूपात दाखवण्यात आली होती. तुळजाभवानी मंदिराचे पुजारी, भाविक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्याला जोरदार आक्षेप घेतल्यानंतर सरकारने ते संकल्पचित्र बदलण्याचे निर्देश आज दिले.
श्री क्षेत्र तुळजापूर येथील कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर परिसराच्या विकास प्रकल्पासंदर्भात आज मंत्रालयात धाराशीवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत बैठक झाली. हा प्रकल्प पुढील तीन-साडेतीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन असून त्याचे भूमिपूजन येत्या नवरात्रोत्सवात करण्याचा सरकारचा मानस आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच त्याचा आराखडा सादर केला गेला. त्या आराखडय़ामध्ये तुळजाभवानी माता आणि शिवरायांचे संकल्पचित्र होते. त्या संकल्पचित्राला सर्वांनीच आक्षेप घेतला. शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी तुळजाभवानी ज्या स्वरूपात आहे तसेच शिल्प उभारले गेले पाहिजे असा आग्रह धरला. त्यावर संकेतस्थळावरील विकास आराखडय़ाच्या संकल्प चित्रातून प्रतिमा काढून टाकण्यात यावी आणि शिल्प तयार करताना पुरातत्व विभाग, इतिहासतज्ञ आणि संबंधितांशी चर्चा करूनच देवीची प्रतिमा उभारली जावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कीर्ती पुजार यांना दिले. विकास आराखडय़ाबाबत प्रसिद्धी देण्यापूर्वी प्रकल्प अध्यक्षांची परवानगी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
n देशभरातून दरवर्षी सुमारे दीड कोटी भाविक श्री क्षेत्र तुळजापूरला भेट देत असतात. त्यांना भविष्यात चांगल्या सुखसुविधा मिळाव्यात तसेच तुळजापूर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने शासनाने 1,865 कोटी रुपये खर्चाचा तुळजापूर विकास आराखडा बनवला आहे. या प्रकल्पामध्ये तुळजाभवानी मंदिर परिसर आणि संपूर्ण शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या सर्व बाबी अंतर्भूत करण्यात आल्या आहेत.