“लग्नाचं आमिष दाखवलं, कुटुंबाला सून म्हणून ओळख करून दिली अन्…”, RCB च्या स्टार खेळाडूवर तरुणीनं केले शोषणाचे आरोप

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल 2025 चा चषक उंचावला. 18 वर्षांमध्ये पहिल्यांदा आरसीबीला आयपीएल विजेतेपद पटकावता आले. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही आणि आरसीबीच्या विजयोत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरसीबी संघ, आयोजकांविरुद्ध गुन्हाही दाखल झाला. तेव्हापासून आरसीबीच्या मागे लागलेले शुक्लकाष्ठ संपण्याचे नाव नाही. आता आरसीबीचा स्टार खेळाडू यश दयाल अडचणीत सापडला असून एका तरुणीने त्याच्यावर शारीरिक शोषणाचे आरोप केले आहेत. पोलीस दखल घेत नसल्याने तिने थेट मुख्यमंत्र्यांकडे न्यायाची मागणी केली आहे.

यश दयाल हा आरसीबीचा स्टार गोलंदाज आहे. त्याने अनेक लढतींमध्ये मोक्याच्या क्षणी कामगिरी उंचावत संघाला सामना जिंकून दिला आहे. मात्र आता त्याच्यावर उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील एका तरुणीने लग्नाचे आमिष दाखवून भावनिक, मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री ऑनलाईन तक्रार पोर्टल, आयजीआरएसद्वारे तिने तक्रार दाखल केली असून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.

मुख्यमंत्री कार्यालयानेही याची दखल घेत इंदापूरमच्या सर्कल ऑफिसरकडून अहवाल मागवला आहे. तसेच गाझियाबाद पोलिसांनाही कारवाईसाठी 21 जुलैपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. यामुळे यश दयालच्या अडचणीत वाढ झाली असून क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार तरुणीने तिचे आणि यश दयालचे 5 वर्षांपासून संबंध असल्याचे म्हटले आहे. या काळात त्याने लग्नाचे आमिष दाखवून भावनिक, मानसिक आणि शारीरिक शोषण केले. त्याने तक्रारदार तरुणीची त्याच्या कुटुंबाला सून म्हणून ओळख करून दिली होती. यामुळे तिचा त्याच्यावर पूर्ण विश्वास बसला होता, असेही नमूद करण्यात आले आहे.

तक्रारदार तरुणीला आपली फसवणूक होत असल्याचा अंदाज येताच तिने जाब विचारला. तेव्हा तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. संबंधादरम्यान तक्रारदार तरुणीला आर्थिक आणि भावनिकदृष्ट्या त्याच्यावर अवलंबून राहण्यास भाग पाडले. नंतर तिच्या असे निदर्शनास आले की, आरसीबीच्या या खेळाडूचे अनेक महिलांसोबत अशाच प्रकारचे संबंध होते. याबाबत तक्रारदार तरुणीने 14 जून 2025 रोजी 181 क्रमांकावर संपर्क साधला, मात्र पोलिसांनी विशेष दखल घेतली नाही. आर्थिक आणि सामाजिक असहाय्यतेमुळे तिने सीएमओ कार्यालयाकडे धाव घेतली असून तिच्याकडे पुरावे म्हणून चॅट रेकॉर्ड, स्क्रीनशॉट, व्हिडीओ कॉल आणि फोटो आहेत, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.