आफ्रिकन देश मालीमध्ये 3 हिंदुस्थानी नागरिकांचं अपहरण, अल कायदाशी संबंधित दहशतवादी संघटनेनं घेतली जबाबदारी

पश्चिम आफ्रिकन देश मालीमध्ये एका सिमेंट कारखान्यावर अल कायदा या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेने हल्ला केला आहे. या हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी कारखान्यात काम करणाऱ्या तीन हिंदुस्थानी नागरिकांचे अपहरण केले. हिंदुस्थानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एक निवेदन जारी करत याबाबत माहिती दिली. ही घटना 1 जुलै रोजी घडली आहे.

मालीतील कायेस येथील डायमंड सिमेंट कारखान्यामध्ये काम करणाऱ्या तीन हिंदुस्थानी नागरिकांचे 1 जुलै रोजी अपहरण करण्यात आले. दहशतवाद्यांच्या एका गटाने कारखान्यावर हल्ला केला आणि 3 नागरिकांचे अपहरण करत त्यांना ओलीस ठेवले. मालीमध्ये झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी अल कायदाशी संबंधित दहशतवादी संघटना ‘जमात नुसरत अल इस्लाम वन मुस्लिमीन’ने घेतली आहे.

दरम्यान, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय मालीची राजधानी बमाको येथील हिंदुस्थानी दूतावास, सरकारशी संबंधित अधिकारी आणि सिमेंट कारखान्याच्या व्यवस्थापनाशी संतत संपर्कात आहे. तसेच अपहरण झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांशीही संपर्क साधण्यात आला आहे. केंद्र सरकारने या घटनेची तीव्र शब्दात निषेध करत हिंदुस्थानी नागरिकांची तात्काळ सुटका करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आवाहन माली सरकारला केले आहे.

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी मालीतील बदलत्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन असून हिंदुस्थानी नागरिकांची लवकरात लवकर सुटका होण्यासाठी विविध स्तरांवर कार्य करत आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केले. तसेच मालीतील अन्य हिंदुस्थानी नागरिकांना सतर्क राहण्याचे, सावधानता बाळगण्याचे आणि दूतावासाच्या संपर्कात राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.