
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरी महाराष्ट्रातील लाखो लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱया लोकप्रतिनिधींनाही मराठी भाषा येत नसल्याचे आज विधानसभेत समोर आले. नऊ आमदारांना मराठी भाषेची अडचण असल्याने त्यांना इंग्रजी भाषेतून कामकाज पत्रिका पुरवली जात असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. त्यावर भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी संताप व्यक्त करत मराठी येत नसलेल्या आमदारांना ब्रिटिश संसदेत पाठवा, असा उपरोधिक सल्ला सरकारला दिला.
विधानसभेत इंग्रजीतील कामकाज पत्रिका पाहून मुनगंटीवार यांनी ‘कामकाज पत्रिका इंग्रजीतून का, असा प्रश्न औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे उपस्थित केला. सभागृहातील कामकाज मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत चालवता येत असले तरी अद्याप सभागृहात इंग्रजीतील कामकाज पत्रिका आपण पाहिलेली नाही. एकीकडे मराठीला अभिजात भाषा करायची, प्रशासकीय अधिकाऱयांना मराठी शिकायला लावायचे, मग ज्यांना मराठी बोलता येत नाही त्यांना हिंदीची संधी असताना इंग्रजीतून कामकाज पत्रिका कशासाठी? असा सवाल मुनगंटीवार यांनी केला. महाराष्ट्राच्या विधानसभेची नियमावली करताना त्यावेळी इंग्रजीचा प्रभाव असेल; परंतु याविषयी नियम समितीची बैठक घेऊन कामकाजातील इंग्रजी शब्द काढून टाकावेत. मराठी भाषा शिकलीच पाहिजे, असे मुनगंटीवार म्हणाले.