दुरुस्ती सुरू असतानाच दापोलीतील शिवकालीन गोवा किल्ला ढासळला, तीन ठिकाणी तटबंदी जमीनदोस्त; सात कोटी पाण्यात

राज्य सरकार आणि पुरातत्व विभागाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर नव्या पुतळ्याचा चौथराही खचू लागल्याचे समोर आले असताना आता दापोलीमध्ये तर चक्क दुरुस्ती सुरू असतानाच शिवकालीन गोवा किल्ला ढासळल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या दुरुस्तीच्या कामासाठी सरकारने तब्बल पावणेसात लाख रुपये खर्चाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे शिवप्रेमींमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील दापोलीच्या हर्णे येथील हा गोवा किल्ला गेल्या अनेक वर्षांपासून ऊन, वारा, पाऊस आणि समुद्री लाटांचा तडाखा सहन करीत उभा आहे. मात्र किल्ल्याची काही ठिकाणी दुरुस्ती आवश्यक असल्यामुळे सरकार आणि पुरातत्व विभागाकडून या किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. मात्र इतक्या मोठय़ा प्रमाणात खर्च करूनही काम सुरू असतानाच किल्ल्याची तटबंदी तीन ठिकाणी ढासळली आहे.

कामाची चौकशी करून कारवाई करा

किल्ल्याच्या बुरुजावर पाऊस पडला तरी पावसाचे पाणी साचून राहणार नाही अशी संरचना आहे. शिवाय आताही पाऊस सुरू नसताना किल्ला ढासळला आहे. त्यामुळे निकृष्ट कामामुळेच तटबंदी, बुरूज ढासळल्याचे स्पष्ट झाले आहे.

विशेष म्हणजे दुरुस्ती सुरू असल्याबाबत साधा फलकही या ठिकाणी लावला नाही. त्यामुळे कामाच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे या कामाची चौकशी करावी, अशी मागणीही शिवप्रेमीनागरिकांकडून होत आहे.