खाऊगल्ली – गजबजलेली खाऊगल्ली

>> संजीव साबडे

दक्षिण मुंबईतील महत्त्वाची जागा म्हणजे आझाद मैदान. आंदोलनांचे, आपल्या मागण्या मांडण्यासाठी हक्काचे ठिकाण असणार्या आझाद मैदान परिसरातील महापालिका खाऊगल्ली खवय्यांचे हक्काचे ठिकाण. झुणका भाकरी, पावभाजी, वडापाव, बटाटावडा ते वेगवेगळे चाट, थंडगार पेयं अशा जिव्हातृप्ती करणार्या असंख्य पर्यायांनी ही गल्ली कायम गजबजलेली असते.

पूर्वीच्या व्हीटीला (आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) गेला नाही असा मुंबईकर नसेल. मुंबई व महाराष्ट्रातील सर्व आंदोलनांचं केंद्र आझाद मैदान. शेतकरी, कामगार, शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी, सर्व राजकीय पक्ष, विविध जातीधर्माच्या संघटना आणि आपल्या मागण्या मांडण्यासाठी लोकांचं हक्काचं ठिकाण म्हणजे आझाद मैदान. पूर्वी तिथून मोर्चे सुरू होऊन काळा घोडा, मंत्रालयाची मागील बाजूचं सम्राट हॉटेल किंवा हुतात्मा चौकापर्यंत जात. आता निदर्शक, मोर्चेकऱयांनी आझाद मैदानात जमायचं आणि तिथंच निदर्शनं व सभा घ्यायची, असा नियम, पायंडा पडला. मग तिथं येणाऱयांसाठी खाण्याचे अनेक स्टॉल्स आले. त्यामुळे नोकरदार व कामासाठी फोर्टमध्ये येणाऱयांचीही सोय झाली आणि मग ती झाली महापालिका मार्गावरील खाऊगल्ली.

पूर्वापार तिथं गेलं की, खाण्याची काही ठिकाणं ठरलेली असत. त्यापैकी एक महापालिका मार्गाच्या खाऊगल्लीतलं मनोहर जोशी-माधव कोकणे यांचं झुणका भाकर केंद्र. पूर्वी पन्नास पैशात झुणका व एक भाकरी मिळत असे. एक जादा भाकरी घेतली की पोटभर जेवण व्हायचं. अनेक पत्रकार, राजकारणी तिथं झुणका भाकर खाताना दिसत. ते केंद्र बंद होऊनही बराच काळ लोटला, पण गल्लीवरचं लोकांचं प्रेम कायम आहे. काही काळाने झुणका भाकर केंद्राच्या शेजारी कॅनन जय जवान पावभाजी केंद्र सुरू झालं आणि झुणका भाकरची काही गर्दी पावभाजीकडे वळली. लष्करातून निवृत्त झालेल्या अप्पा दांडेकर यांच्या या पावभाजी केंद्राला पन्नास वर्षे झाली असावीत.

तेव्हा मुंबईत ताडदेवच्या सरदारची पावभाजी प्रसिद्ध होती आणि बहुधा तिथेच फक्त पावभाजी मिळत होती. तिथं मुद्दाम ती खायला जाणारे फार कमीच. मुंबईकरांमध्ये पावभाजी लोकप्रिय झाली ती दांडेकर यांच्या कॅननमुळे. तेव्हा ते स्वत हजर असायचे. पावभाजीत बटर म्हणजे तुपापासून विविध भाज्या आणि वरून पसरली जाणारी कोथिंबीर यांचं प्रमाण नीट आहे ना, हे पाहत. सुरुवातीला ती खाण्यासाठी तरुणांची अधिक गर्दी असायची, पण हळूहळू पावभाजी खायची ती कॅननची, असं समीकरण बनून गेलं. आज मुंबई व ठाण्यात मिळून पावभाजीचे हजारावर स्टॉल्स असतील आणि रेस्टॉरंट्स वेगळीच, पण पावभाजी म्हटलं की असंख्य लोकांना आजही आठवते कॅननची पावभाजी. पूर्वी पावभाजी साधी असायची.

आजही तेथील पावभाजीची चव मस्त आणि कायम आहे. आता लोकांची आवड पाहून अमूल बटर भाजी, चीज भाजी, जाईन पावभाजी मसाला पाव हे बदल त्यांनी कधीच आणले आहेत. याशिवाय तिथं आता विविध पुलाव, साबुदाण्याची खिचडी, दहीवडा, लस्सी, रबडी, बर्गर, सँडविच असं बरंच काही कॅननच्या जय जवान स्टॉलवर मिळतं. दिवसभरात कैक हजार लोक तिथं काही ना काही खात असतात. त्यापैकी बहुसंख्य म्हणजे हजारो लोक पावभाजीच खाण्यासाठी तिथं येतात. मुंबईत कॅनन हा आता पावभाजीचा ब्रॅण्ड झाला आहे. सरदार आणि कॅनन हे मुंबईतील सर्वात मोठे व लोकप्रिय ब्रॅण्ड ठरले आहेत. त्यातही मराठी माणसाचा म्हणून कॅननच्या जय जवान पावभाजीचं कौतुक अधिक.

ही खाऊगल्ली तिथेच जवळ असलेल्या आरामच्या वडापावमुळेही लोकप्रिय आहे. मुंबईतील मराठी लोक बटाटेवडय़ाच्या बाबतीत अत्यंत चोखंदळ. उत्तम वडापावसाठी दहा ठिकाणची नावं घेतली जातात, पण आरामचा बटाटेवडा इतर सर्वांपेक्षा वेगळा. त्यातील भाजीचा रंग वेगळा आणि तिची चवही आगळी. बटाटेवडा किंवा वडापाव खावा तर आरामच्या बाहेर असलेल्या स्टॉलवरचा. स्टॉलकडे न पाहता आत गेलात तर मराठी खाद्यपदार्थांचा खजिनाच हाती लागतो. मुंबईतील आणि मुंबईत बाहेरगावहून आलेले लोक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला उतरले की तिथं हमखास जातात.

तिथं केवळ पावभाजी आणि वडापाव व मराठी तांबे यांच्या आरामच्या मराठी खाद्यपदार्थांचाच पर्याय नाही, आरामच्या रांगेतच पुढे शर्मा स्नॅक्सचं छोटेखानी दुकान आहे. त्या स्टॉल्यवर भेळपुरी, पाणीपुरी, शेवपुरी, रगडा पॅटिस, सामोसा, कचोरी, दहीवडा, दहीभेळ, दही सामोसा हे खाद्यपदार्थ वर्षानुवर्षे मिळत आले आहेत. उत्तम चव, स्वच्छ पदार्थ यामुळे या स्टॉलवरही नेहमी गर्दी दिसते. दुपारपासून संध्याकाळपर्यंत वाढत जाणारी गर्दी शर्मा स्नॅक्सच्या लोकप्रियतेची ओळख सांगते. नंतरच्या काळात तिथं पावभाजी मिळू लागली आणि तवा पुलावही. कॅननच्या तुलनेत छोटी जागा. त्यामुळे कॅननशी स्पर्धा शक्य नाही हे लक्षात घेऊन शर्माने दर थोडे कमी ठेवले आहेत.

आणखी एक ठिकाण सुरू झालं आहे, श्रीराम कॅफे. या नावावरूनच तिथं दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ मिळत असतील हे लक्षात येतं. इडली, डोसा, उत्तप्पा, वडा सांबार असे असंख्य प्रकार तिथं मिळतात. पण व्हेज 65, व्हेज क्रिस्पी, नूडल्स, व्हेज मन्चुयरियन, विविध सूप हे प्रकारही मिळतात. इथला चीज डोसा, चीज पावभाजी डोसा, टोमॅटो ऑम्लेट, कोथिंबीर आणि लिंबाचा स्वाद असलेलं सूप मस्त. इथं कॉफी प्यावीच.

काला खट्टा या आगळ्यावेगळ्या पेयाचा मुंबईतील पहिला स्टॉलही या खाऊगल्लीतच आहे. तिथं न जाता या खाऊगल्लीतून बाहेर पडायचा विचार मनात येऊच शकत नाही. दुपारी तिथल्या स्टॉलवर खाणं झालं की या स्टॉलवर जायलाच हवं. आता काला खट्टा शेकडो ठिकाणी मिळतो आणि त्याच्या मिश्रणाच्या बाटल्याही अनेकांच्या घरी असतात, पण या काला खट्टाची सर इतरांना नाही. शिवाय कलिंगड सरबत हे इथलं वैशिष्टय़. तेही प्यायलाच हवं. आहाहा, काय ती त्या दोन्ही सरबतांची चव!

या खाऊगल्लीच्या शेवटी आझाद मैदानाला लागून एक चहा, बिस्किटं, कोल्ड्रिंक्स वगैरे मिळणारा एक जुना स्टॉल आहे. पूर्वी तिथला बटाटेवडा खूप मस्त असायचा. नंतर तो बिघडला. पण सकाळ, दुपार, संध्याकाळ असंख्य चहाबाज तिथं चहा पीत गप्पा मारत असतात. ही गल्ली चुकूनमाकून राहिली असली तर तिथं नक्की जायला हवं.

[email protected]