
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशी प्राण्यांचा तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्राण्यांच्या तस्करीप्रकरणी एका प्रवाशाला अटक केली आहे. हा प्रवासी बँकॉकहून मुंबईत आला होता. शारुक्कन मोहम्मद हुसेन असे अटक आरोपीचे नाव आहे. अधिकाऱ्यांनी प्रवाशाच्या बॅगेतील प्राणी ताब्यात घेतले आहेत.
परदेशी प्राण्यांच्या तस्करीबाबत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. अधिकाऱ्यांनी हुसेनच्या बॅगेची तपासणी केली असता त्यात दोन किंकाजाऊ (मध्य आणि दक्षिण अमेरिकेच्या वनात आढळणारा सस्तन प्राणी), दोन पिग्मी मार्मोसेट (जगातील सर्वात लहान माकड) आणि 50 अल्बिनो रेड-इअर स्लाइडर्स आढळले.
सर्व प्राणी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेत आरोपीविरोधात 1962 च्या सीमाशुल्क कायदा, वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 च्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.