
नगर-मनमाड महामार्गावर पुन्हा एकदा अपघात घडला आहे. राहुरी कृषी विद्यापीठ परिसरात मंगळवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास अहिल्यानगर दिशेने जात असलेल्या कंटेनरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार ज्ञानदेव पाटीलबा बलमे (वय ३१, रा. वडनेर, ता. राहुरी) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
ज्ञानदेव बलमे अहिल्यानगर येथे कामाला होते. ते दररोज वडनेर ते अहिल्यानगर अपडाऊन करत असत. मंगळवारी सकाळी ते अहिल्यानगर येथे कामासाठी जात असताना हा अपघात घडला. रस्त्यावर खड्डे असल्याने त्यांनी दुचाकीचा वेग कमी केला. त्याचवेळी कंटेनरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दोन दिवसांपूर्वीच एका महिलेचा याच महामार्गावर अपघातात मृत्यू झाला होता. त्या महिलेच्या संतप्त नातेवाईकांनी रास्ता रोको करून महामार्ग रोखला होता. चार दिवसांत दोन निरपराध लोकांचा बळी गेल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या महामार्गावर होणाऱ्या अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. यापूर्वीही असंख्य तरुणांना या मार्गावर आपले प्राण गमवावे लागले आहेत. या सततच्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. नगर-मनमाड महामार्ग आणखी किती बळी घेणार? असा सवाल संतप्त नागरिक करत आहे. प्रशासनाने या महामार्गावर रस्त्यांची दुरुस्ती व सुरक्षिततेची पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.