केळशी गावाने पलेत्या नृत्याची जपली अनोखी परंपरा; वाजत गाजत जागवल्या गौरी

आलेली गवर फुलून जाय , माळ्यावर बसून पोळया खाय…अशाप्रकारची गौरी गणपती नाचाची गाणी गात गौरी पूजनाच्या दिवशी रात्री केळशीत हाती पेटत्या पलेत्या घेऊन नाचल्या जाणाऱ्या पलेत्यांच्या या साहसी नाचाची परंपरा यावेळीही उत्साहात साजरी करण्यात आली. दापोली तालुक्यात केळशी या गावात गौरी पूजनाच्या दिवशी रात्री पलेत्या नाचाची नाचली जाणारी परंपरा जूनी परंपरा आहे. अशी ही पेटत्या पलेत्या हाती घेऊन नाचली जाणारी साहसी परंपरा आजही श्रध्देने ग्रामस्थांकडून जोपासली जात आहे.

केळशी गावातील नवानगर , कांदेवाडी ,भगत आळी , बापू आळी ,वरचा डुंग , खालचा डुंग , चिंचवळ, बाजारपेठ, आतगाव भाट आदी वाड्या, आळया आणि पाखाडयांमधील लोक गौरी पूजनाच्या दिवशी रात्री पांढरे शुभ्र धोतर सदरा किंवा झब्बा लेंगा आणि डोक्यावर गांधी टोपी परीधान करून आपल्या पलेत्या नाचाचे पथक घेऊन आपल्या रहिवास ठिकाणांहून केळशी ग्रामदैवत श्री कालभैरव मंदिर येथे नाचत नाचत येतात. तर जय हिंद मोहल्ल्याचे पथक हे केळशी बाजारपेठेपर्यत येते. अशा या पलेत्या नाचाच्या पथकातील फळीत पहिल्या नाचणाऱ्याच्या हाती धगधगणारी पेटती मशाल असते तर उर्वरित नाचणाऱ्यांच्या हाती पेटते पलेते असतात.

ढोल सनई टिमकी वाद्यांच्या तालावर नाचणाऱ्यांचा इकडचा तिकडे पावंडा होणार नाही अशा शिस्तबध्द पध्दतीने अगदी गाण्यांच्या ठेक्यातील पावंडयावर हे पथक केळशी ग्रामदैवत श्रीकालभैरवाचे दर्शनासाठी येतात. श्री कालभैरव मंदिरासमोर आल्यावर तेथे ढोल सनई टिमकीच्या वाद्याच्या ठेक्यावर फेर धरून नाचतात. एकाच्या हाती धगधगणारी मशाल तर अन्य सहकाऱ्यांच्या हाती पेटत्या पलेत्या असतात. पलेत्या प्रज्वलित करण्यासाठी सतत गोडेतेल पलेत्यांमध्ये ओतले जाते. त्यामुळे पथकातील सर्वांकडे असलेले पलेते आगीने धगधगत असतात. नाचाच्या पथकातील प्रत्येकांच्या हाती जरी पेटत्या पलेत्या असल्या तरी आजवर कुणालाही या पेटत्या पलेत्यांचा धोका पोहोचून दुखापत झालेली नाही. नाचणारे पथक हे आपल्या पथकासोबतच अन्य पथकातील कुणालाही इजा पोहोचणार नाही याची पूर्णपणे खबरदारी घेते. येथे शिस्तीला अधिक प्राधान्य देऊन सण उत्सव साजरे केले जातात हे या केळशी गावाचे विशेष आहे .

घरोघरी पूजा झाल्यानंतर गावात धरतात फेर
केळशी ग्रामदैवत श्री कालभैरव मंदिरासमोर फरसावर फेर धरून नाचल्यानंतर सर्व आळया पाखाडया वाडयांमधील लोक हे आपापल्या आळ्या, वाडा पाखाड्यांमध्ये जावून गौरीसमोर रात्रभर नाचतात. केळशीमधील अनेक घरात गौरी पूजन झालेले असते. या नाचाच्या माध्यमातून सर्वजण भवानीचा गोंधळ घालीत असतात. अशी ही वर्षानुवर्षाची परंपरा त्याच श्रध्देने आणि परंपरेने केळशीतील लोकांनी जोपासली आहे.