मराठी पाऊल पडते पुढे! कीर्ती गणोरकर यांनी उलगडला सन फार्माच्या एमडी पदापर्यंतचा प्रवास

देशातील औषध निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी सन फार्माचे नवे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कीर्ती गणोरकर यांची निवड झाली आहे. गणोरकर यांनी लिंक्डइनवर पोस्ट लिहून या पदापर्यंत कसे पोहोचले ते सांगितले आहे. कीर्ती गणोरकर यांनी पोस्टमध्ये लिहिलेय की, ती 90 च्या दशकाची सुरुवात होती आणि मी नोकरीची जाहिरात वाचली. मी सन फार्माच्या बडोद्यातील सिनर्जी हाऊस येथील कार्यालयात मुलाखतीसाठी दाखल झालो.

काही अपरिहार्य कारणांमुळे माझी मुलाखत रात्री 9 वाजता सुरू झाली. मुलाखत रात्री 10.30 वाजता संपली आणि मला रात्री 11 वाजता मुंबईला जाणारी रेल्वे पकडायची होती. त्या वेळी एचआर विभागाचे प्रमुख भागवत याज्ञिक यांनी मला त्यांच्या मारुती 800 मध्ये बसवले आणि आम्ही बडोद्याच्या रस्त्यांवरून स्टेशनवर पोहोचलो. या प्रवासात ते माझ्याशी पगाराच्या वाटाघाटी करत होते. त्यांनी हे सर्व इतक्या सहजपणे कसे हाताळले हे पाहून मला आश्चर्य वाटले आणि हा मला सन फार्मात शिकायला मिळालेला पहिला धडा होता.

सध्याची जबाबदारी

सन फार्मातील सध्याच्या भूमिकेबाबत गणोरकर यांनी लिहिले की, त्या प्रवासाने मला स्टेशनसह सन फार्मामध्येही पोहोचवले. आता अनेक दशकांनंतर मी सनच्या जागतिक विस्ताराला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. यामध्ये अमेरिकेत आमच्या स्थलांतरासाठी पायाभूत सुविधा तयार करणे, जपानमध्ये आमचे पहिले पाऊल टाकणे, जगभरातील युनिट्सचे नेतृत्व करणे आणि मोठय़ा आव्हानांना तोंड देणे यांचा समावेश आहे.

नेतृत्व करणे म्हणजे…

कीर्ती गणोरकर म्हणाले, मी शिकलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे नेतृत्व करणे म्हणजे तुमच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे असणे नाही. नेतृत्त्व म्हणजे लोक जोडणे, योग्य प्रश्न विचारणे, सर्वांचे म्हणणे ऐकून घेणे आणि सन फार्मामध्ये मी पहिल्यांदा अनुभवला तो मानवी स्पर्श जपणे आहे.