डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारत प्रकरण; समर्थ कॉम्प्लेक्सच्या रहिवाशांचा पेट्रोलच्या बाटल्या घेत आत्मदहनाचा इशारा

डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारतींवर कल्याण-डोंबिवली पालिकेने सुरू केलेल्या पाडकाम कारवाईमुळे आयरे गावातील समर्थ कॉम्प्लेक्स इमारतीत राहणाऱ्या शेकडो गोरगरीब रहिवाशांच्या संतापाचा भडका उडाला. महापालिकेच्या कारवाईला तीव्र विरोध करत या इमारतीतील महिला व पुरुष रहिवासी हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन रस्त्यावर उतरले. आमच्या घरावर कारवाई झाली तर स्वतःवर पेट्रोल ओतून जाळून घेऊ, असा थेट इशाराच या रहिवाशांनी दिला. त्यामुळे महापालिकेने या इमारतींवरील कारवाई तूर्त स्थगित केली आहे.

आयरे गावातील समर्थ कॉम्प्लेक्सवर कारवाई करण्यासाठी पालिकेचे पथक घटनास्थळी येणार होते. त्यामुळे या इमारतीतील रहिवासी संतापले. आम्ही सर्वसामान्य कुटुंबे आहोत. बँकांकडून कर्ज काढून घरे घेतली तरी आम्हाला बेघर कसे करता, असा सवाल त्यांनी केला. हे रहिवासी हातात पेट्रोलच्या बाटल्या घेत इमारतीखाली गोळा झाले. त्यांनी हातात पेट्रोलच्या बाटल्या घेतल्या होत्या. आमच्या घरांवर बुलडोझर चालवाल तर जाळून घेऊ, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी रहिवाशांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली व्यथा मांडली.