रस्त्यावर उभ्या असलेल्या एसयूव्हीला अज्ञात वाहनाची धडक, 4 जणांचा मृत्यू; 3 जण जखमी

रस्त्यावर उभ्या असलेल्या एसयूव्हीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत चार जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. पोलीस अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.

कानपूर-वाराणसी महामार्गावर ही घटना घडली. एसयूव्ही बिघडल्याने रस्त्याच्या कडेला उभी होती. यादरम्यान समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने एसयूव्हीला धडक दिली. अपघात झाला तेव्हा एसयूव्हीत सात प्रवासी होते. अपघातात कारमधील चार जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. सर्वजण कानपूरचे रहिवासी आहेत. तर 60 वर्षीय इसम थोडक्यात बचावला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.