
मुंबईतील मुलुंड टोलनाक्याजवळ सोमवारी सकाळी सात ते आठ वाहने एकमेकांवर धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात सर्व वाहनांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातामुळे मुलुंड टोलनाक्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर हा अपघात घडला. पुढील कारने अचानक ब्रेक दाबल्याने मागून भरधाव येणाऱ्या गाड्या एकमेकांवर धडकल्या. यामुळे मुंबई-ठाणे मार्गावर काही काळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सर्व वाहनं बाजूला करत वाहतूक पूर्ववत केली. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.