मध्य प्रदेशमध्ये विषारी कफ सिरपनं घेतला 10 चिमुकल्यांचा जीव; डॉक्टरला अटक, कंपनीविरोधात गुन्हा दाखल

मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये विषारी कफ सिरपमुळे अनेक लहान मुलांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशमधील छिंदवाडा जिल्ह्यात 10 लहान मुलं दगावली आहेत. या प्रकरणी आता पोलिसांनी मोठी कारवाई केली असून कफ सिरप लिहून देणाऱ्या डॉक्टरला अटक केली आहे. प्रवीण सोनी असे या डॉक्टरचे नाव असून शनिवारी रात्री त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. त्याच्या विरोधात आणि कोल्ड्रिफ सिरप बनवणाऱ्या sresun फार्मासूटिकलच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी औषधिद्रव्य व सौंदर्यप्रसाधन अधिनियम, 1940 च्या कलम 27(ए) आणि भादवि कलम 105 व 276 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. छिंदवाडामध्ये मृत्यू पावलेल्या बहुतांश मुलांना डॉ. सोनी यांनीच कफ सिरप लिहून दिले होते. या कफ सिरपचा रिपोर्टही शनिवारी रात्री आला आहे. कोल्ड्रिफ कफ सिरपमधअये डायएथिलीन ग्लायकोलचे प्रमाण 48.6 टक्के आढळले असून हे आरोग्यसाठी हानीकारक आहे.

छिंदवाडा जिल्ह्यामध्ये 7 सप्टेंबर रोजी किडनीशी संबंधित संक्रमणामुळे 10 मुलांचा मृत्यू झाला. त्यानंतर मध्य प्रदेश सरकारने कोल्ड्रिफ कफ सिरप विकण्यास बंदी घातली. संपूर्ण राज्यात हे कफ सिरप विकण्यास बंदी असून हे कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या अन्य उत्पादनांवरही बंदी घातली जात असल्याची माहिती मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली.