
मध्य प्रदेश व राजस्थानात 17 मुलांचे बळी घेणारा कोल्ड्रिफ सिरप (एस-13)चा साठा महाराष्ट्रात आलेलाच नाही. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही, अशी माहिती राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने आज दिली. मध्य प्रदेशातील घटनेनंतर केंद्र सरकारने एस-13 बॅचच्या कोल्ड्रिफ सिरपचे वितरण व वापर थांबवण्याच्या सूचना दिल्या होत्या.
महाराष्ट्र एफडीने तात्काळ राज्यातील वितरक, विक्रेते व ग्राहकांना तसे आवाहन केले. तसेच, एफडीएने तामीळनाडू ड्रग नियंत्रकांशी संपर्क साधून पुरवठा साखळीची व वितरणाची सद्यस्थिती जाणून घेतली. महाराष्ट्रात कोल्ड्रिफ कफ सिरपचा पुरवठा झालेलाच नाही, अशी माहिती तामीळनाडूच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री 33 दिवसांनंतर पीडितांच्या घरी
मध्य प्रदेशात कोल्ड्रिफ सिरपमुळे पहिला मृत्यू 4 सप्टेंबर रोजी झाला. त्यानंतर एका मागोमाग एक 14 मुलांचा मृत्यू झाला. ही बातमी देशभरात पसरल्यानंतर मुख्यमंत्री मोहन यादव खडबडून जागे झाले. तब्बल 33 दिवसांनी ते छिंदवाडा येथे पोहोचले व त्यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली.





























































