शौचालय, बाथरूमची सफाई नीट न केल्याची शिक्षा; तलासरीतील वसतिगृहात 12 विद्यार्थ्यांना बेदम मारहाण, आरोपीला अटक

शौचालय तसेच बाथरूमची साफसफाई नीट न केल्याची अघोरी शिक्षा तलासरीच्या वनवासी कल्याण आश्रमातील वसतिगृहात शिकणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना देण्यात आली. या कामावर देखरेख ठेवणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थ्याने मुलांना काठीने बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. ही मारहाण एवढी भयानक होती की काही मुलांच्या हाता-पायांवर वळ उठले, तर अन्य विद्यार्थ्यांच्या पोटरीला जबर मार लागला असून मुलांचे पायदेखील सुजले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. या मारहाणीनंतर आश्रमशाळेतील विद्यार्थी व त्यांचे पालक हादरले असून ‘शिक्षा’ करणाऱ्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.

तलासरीतील पाटकरपाडा येथे वनवासी कल्याण आश्रम आणि समाजकल्याणमार्फत वसतिगृह चालवले जाते. परिसरातील आदिवासी विद्यार्थी येथे राहून विविध शाळांमध्ये शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. मंगळवारी आठवीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शौचालय व बाथरूम साफसफाई करण्याचे काम देण्यात आले होते. या मुलांनी साफसफाई केली. मात्र पुन्हा शौचालय वापरात आल्याने घाण झाली होती. साफसफाईवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाने नेमलेल्या एका विद्यार्थ्याने संतापाच्या भरात या विद्यार्थ्यांना काठीने प्रचंड मारहाण केली.

अधीक्षकांवरही कारवाई करा

या मारहाणीत जखमी झालेल्या मुलांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मारहाण करणारा विद्यार्थी हा त्याच आश्रमात राहून आयटीआयचे शिक्षण घेत आहे. हा प्रकार घडल्यानंतर पालकांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. त्यानंतर अघोरी ‘शिक्षा’ देणाऱ्या मुलाला अटक करण्यात आली असून आम्ही मुलांना वसतिगृहात राहण्यासाठी पाठवतो की मार खाण्यासाठी? असा थेट सवाल पालकांनी केला आहे, तर याप्रकरणी वसतिगृहाच्या अधीक्षकांवरदेखील कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.