
कल्याण पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. कल्याण परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलिसांनी तब्बल १७ ड्रग्ज तस्करांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. विशाखापट्टणमपासून कल्याणपर्यंत या ड्रग्ज तस्करांनी हात-पाय पसरले होते. या कारवाईत पोलिसांनी ११५ किलो गांजा, वाहने, पिस्तूल, वॉकीटॉकीसह तब्बल ७० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
खडकपाडा पोलिसांनी काही दिवसांपूर्वी गांजा सेवन करणाऱ्या एका तरुणाला अटक केली होती. या तरुणाने गांजा कुठून घेतला याची चौकशी पोलिसांनी सुरू केली असता गांजा तस्करीचे धागेदोरे कल्याण, ठाणे, मुंबई, नाशिक, पुण्यापासून थेट विशाखापट्टणमच्या जंगलापर्यंत पोहोचले. यानंतर ड्रग्ज तस्करांचा छडा लावण्यासाठी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली एसीपी कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे, अनिल गायकवाड यांच्या पथकाने तपास करून टोळीचा म्होरक्या गुफरान शेख (रा. बल्याणी) याच्यासह १३ जणांना अटक केली. आरोपीमध्ये एका महिलेचा समावेश आहे. आरोपींविरोधात २० पेक्षा जास्त गुन्हे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह तेलंगणा राज्यात विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
अल्पवयीन मुलीची छेड; सुरक्षारक्षक पोलिसांच्या ताब्यात
कल्याण शहरातील एका हायप्रोफाईल सोसायटीतील सुरक्षारक्षकाने अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर संतप्त नागरिकांनी तत्काळ त्या सुरक्षारक्षकाला पकडून खडकपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. अमोल जगताप असे सुरक्षारक्षकाचे नाव असून त्याला अटक केली आहे. कल्याण पश्चिमेकडील एका हायप्रोफाईल सोसायटीमध्ये ड्युटीवर असलेल्या अमोल जगताप नावाच्या सुरक्षारक्षकाने लिफ्ट परिसरात खेळत असलेल्या एका अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केले. नागरिकांना या प्रकाराची कुणकुण लागताच त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. तत्काळ नागरिकांनी सुरक्षारक्षकाला पकडून चौकशी केली. तत्काळ घटनास्थळी पोलिसांना पाचारण करत त्याला खडकपाडा पोलीस ठाण्यात सुपूर्द केले. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. आरोपी अमोल जगताप याच्याविरोधात पोक्सो कायद्यानुसार आणि छेडछाड कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.