
कल्याणच्या वसंत व्हॅली डी मार्टमध्ये एका अमराठी महिला ग्राहकाने कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत मराठी बोलण्यास नकार दिला. मराठी माणसं भिकारी आहेत, कचरा आहेत, आमच्या जीवावर जगतात, अशी गरळ ओकत मायबोली मराठी आणि महाराष्ट्राचा अपमान केला. मराठीद्वेष्ट्या महिलेची अरेरावी समजताच शिवसेनेच्या रणरागिणी आणि मनसेचे कार्यकर्ते डी मार्टमध्ये धडकले. यानंतर मात्र हुज्जत घालणाऱ्या महिलेने रडत हात जोडून माफी मागितली. पुन्हा मराठीचा अपमान करणार नाही, अशी दिलगिरी संबंधित महिलेने व्यक्त केली.
डी मार्टमध्ये एक मराठी कर्मचारी ग्राहकांशी मराठीत संवाद साधत होता. यावेळी एक अमराठी ग्राहक महिला मी मराठीत बोलणार नाही असे म्हणत कर्मचाऱ्याशी हुज्जत घालू लागली. यावर कर्मचाऱ्याने काही हरकत नाही असे म्हणत विषय थांबवला. मात्र संबंधित महिला गरळ ओकतच राहिली. मराठी माणसं भिकारी आहेत, महाराष्ट्र भिकारी आहे, कचरा आहे, मराठी माणसं आमच्या जीवावर जगतात अशी बेताल बडबड करत होती. यावेळी डी मार्टमध्ये खरेदीसाठी आलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या रणरागिणी कांचन खरे यांनी हा संपूर्ण प्रकार पाहिला. त्यांनी अमराठी महिलेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र तिची अरेरावी सुरूच होती. यानंतर मात्र कांचन खरे यांनी आक्रमक होत मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या अमराठी महिलेला हिसका दाखवला. याचवेळी मनसे कार्यकर्तेदेखील डी मार्टमध्ये दाखल झाले. आधी अरेरावी करणारी ही महिला चक्क रडायला लागली. तिने हात जोडून आणि कान पकडून माफी मागितली.