सहा नृत्यांगनांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न, कोल्हापुरात महिला सुधारगृहातील प्रकार

करवीर तालुक्यातील कात्यायनी परिसरात देहविक्रीच्या संशयातून ताब्यात घेतलेल्या सहा नृत्यांगनांनी महिला वसतिगृहात सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार अर्ज करूनही जामीन मिळत नसल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर येत आहे. या जखमी महिलांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

रिसॉर्टवर अश्लील नृत्य आणि वेश्या व्यवसाय करणाऱया महिलांवर वारंवार कारवाई झाल्यानंतर कोर्टाने संबंधित महिलांना महिला सुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले होते. गेल्या दोन महिन्यांपासून या महिला सुधारगृहात होत्या. जामीन मिळण्यासाठी वारंवार अर्ज करूनही त्यांना जामीन मिळत नसल्याने नैराश्यातून त्यांनी हाताच्या नसा कापून घेण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत होते. या सगळ्या पीडितांवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू केले आहेत.

बारशाच्या कार्यक्रमात नृत्यांगना नाचवल्या; पोलिसांत गुन्हा

नंदगाव (ता. करवीर) येथे बारशाच्या कार्यक्रमात साऊंड सिस्टीम लावून नृत्यांगना नाचविल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी दोन नृत्यांगनांसह सहा तरुणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गेल्या 10 ते 15 वर्षांपासून व्यवसायाच्या निमित्ताने परजिह्यातून दोन कुटुंबे स्थायिक झालेल्या एका कुटुंबात बारशाच्या कार्यक्रमानिमित्ताने बुधवारी रात्री सार्वजनिक ठिकाणी साऊंड सिस्टीम लावून गाण्याच्या तालावरती दोन तरुणींसोबत काही तरुण अश्लील नृत्य करीत होते. याचा व्हिडीओ व्हायरल होताच ग्रामस्थांतून संतापाची लाट उसळली. गावातील तरुणांनी एकत्रित येऊन घटनास्थळाकडे मोर्चा वळविला.दरम्यान, इस्पूर्ली पोलिसांना याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मुद्दसर शेख यांनी कर्मचाऱयांसोबत घटनास्थळावरून दोन नृत्यांगनासह सहा तरुणांना ताब्यात घेतले.