
घरात गुप्तधन असल्याचे सांगून सुमारे सव्वाकोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोंदूबाबासह सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी भोंदूबाबाने गुप्तधनाच्या नावाखाली पावणेदोन कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. भोंदूबाबाचा सलग दुसरा कारनामा उघडकीस आला असून, भोंदूबाबाला अटक करण्यात आली आहे.
मोहम्मद कादर शेख, इम्रान, तमीन कुरेशी, आयुब रचभरे, सचिन गायकवाड, दाऊद पठाण, लक्ष्मण वाघमारे, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
अक्कलकोट रोडवरील कोंडानगर येथे राहणारे राजू विनायक आडम यांना तुमच्या घरात गुप्तधन आहे ते काढून देतो, असे सांगून सप्टेंबर 2023 ते मार्च 2024 या कालावधीत आडम व त्यांच्या कुटुंबीयांना द्रव्य पिण्यास देऊन जादूटोणा करीत असतानाच भोंदूबाबा मोहम्मद कादर शेख व त्याच्या साथीदारांनी सुमारे 1 कोटी 26 लाख 34 हजार 600 रुपये काढून घेतले. त्यानंतर कोणतेही धन किंवा वस्तू न दिल्याने आडम यांनी मोहम्मद कादर शेख व त्यांचे साथीदार इम्रान, तमीम कुरेशी, आयुब रचभरे, सचिन गायकवाड, दाऊद पठाण, लक्ष्मण वाघमारे यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलीस निरीक्षक वाघमारे तपास करीत आहेत.
दरम्यान, यापूर्वी भोंदूबाबा मोहम्मद शेख याने गोविंद मल्लिकार्जुन वंगारी यांना गुप्तधनाच्या नावाखाली 1 कोटी 87 लाख रुपयांना फसविले आहे. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. सोलापूरसह तुळजापूर, मंगळवेढा, लातूर या ठिकाणीही त्याने अनेकांची फसवणूक केल्याची माहिती पुढे येत आहे.